विशेष प्रतिनिधी
पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, त्याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची माहिती व हालचालींची कसून तपासणी केली जात आहे. ( 111 Pakistani nationals living in Pune)
शहरातील परकीय नागरिक नोंदणी विभाग (एफआरओ)च्या माहितीनुसार, सध्या पुण्यात एकूण १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. यामध्ये ९१ जण दीर्घ मुदतीच्या व्हिसावर, तर २० जण व्हिजिटर व्हिसावर भारतात दाखल झाले आहेत. दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेल्यांमध्ये ३५ पुरुष आणि ५६ महिला आहेत. दरम्यान, आतापर्यंत तीन पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची नोंद आहे.
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारकडून भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परत जाण्याचे निर्देश दिले जात असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
पाकिस्तानी नागरिक प्रामुख्याने नातेवाईकांना भेटण्यासाठी किंवा वैद्यकीय उपचारासाठी भारतात येतात. दीर्घ मुदतीचा व्हिसा ५ वर्षांसाठी वैध असतो, तर व्हिजिटर व्हिसा ९० दिवसांचा असतो.
पोलिसांनी स्पष्ट केलं की, परराष्ट्र मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसारच पुढील कारवाई केली जाणार आहे. कोणताही परदेशी नागरिक भारतात आल्यावर संबंधित पोलिस आयुक्तालयात किंवा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात नोंदणी अनिवार्य आहे. तसेच, एक शहर सोडून दुसऱ्या शहरात प्रवास करताना नोंदवहीत बदल करणे बंधनकारक आहे. वेळोवेळी पोलिसांकडून त्यांच्या वास्तव्याची तपासणी केली जात असते.
देशातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर, अशा परकीय नागरिकांवर अधिक सतर्कतेने लक्ष ठेवण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.