विशेष प्रतिनिधी
पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम देशातील विविध विमानतळांवर जाणवू लागला असून, ८ मे २०२५ रोजी पुणे विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या १३ देशांतर्गत फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. मध्यरात्रीपासून संध्याकाळी ८ वाजेपर्यंत या फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. ( 13 flights at Pune airport cancelled due to border tensions Passengers offered alternative facilities full refund)
पुणे विमानतळ प्रशासनाने यासंदर्भात अधिकृत advisory जाहीर केली असून, गंभीर सुरक्षा परिस्थितीमुळे काही गंतव्य विमानतळांवर तात्पुरती सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे या निर्णयाचा थेट परिणाम पुण्यातून जाणाऱ्या आणि येथे येणाऱ्या फ्लाइट्सवर झाला.
इंडिगो आणि स्पाईसजेट या दोन विमान कंपन्यांच्या एकूण १३ फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. इंडिगोच्या अमृतसर, कोचीन, चंदीगड, हैदराबाद, राजकोट, जोधपूर, सूरतसह अनेक मार्गांवरील उड्डाणे रद्द झाली. स्पाईसजेटच्या पुणे-भावनगर आणि पुणे-जयपूर या फ्लाइट्सही उड्डाण करू शकल्या नाहीत.
विमानतळ प्रशासन आणि विमान कंपन्यांनी रद्द फ्लाइट्सबाबत प्रवाशांना SMS, फोन कॉल्स, मोबाइल अॅप्स आणि विमानतळ घोषणांद्वारे वेळेवर सूचना दिल्या. नागरी विमान संचालन महासंचालनालय (DGCA) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रवाशांना पूर्ण रक्कम परतावा, पर्यायी फ्लाइट्स व प्रवासासाठी आवश्यक सहकार्य दिले जात आहे.
प्रशासनाने प्रवाशांनी घाबरून न जाता आपल्या संबंधित विमान कंपनीशी संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे विमानतळावरील सर्व यंत्रणा सतर्क आहेत. तांत्रिक अडचणी आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय तात्पुरता असून, लवकरच सेवा सुरळीत होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.