विशेष प्रतिनिधी
पुणे: एका सतरा वर्षीय अल्पवयीन बांगलादेशी मुलीला पार्लरमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून अवैध मार्गाने भारतात आणले. त्यानंतर तिला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ( 17-Year-Old Bangladeshi Girl Lured to India with Job Promise Forced into Prostitution in Pune)
मुलीने याला विरोध करताच तिला एका खोलीत डांबून बेल्ट व हाताने मारहाण करत गायब करण्याची धमकी देण्यात आली. पुण्यातील एका सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.
अभिषेक प्रकाश संथेबेन्नुर (वय २२, रा. कर्नाटक), तमन्ना मुख्तार शेख (रा. पुणे) आणि रकीब खान या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोस्को, पिटा कायदा आणि पारपत्र कायद्याचे उल्लंघन अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक आणि तमन्ना यांना अटक करण्यात आली आहे. सहकारनगर पोलिसांनी शुक्रवारी (दि. ११) पहाटे २ वाजल्यापासून सकाळी ११ वाजेपर्यंत शोधमोहीम राबवून पीडित मुलीची सुटका केली.
पीडित मुलगी आरोपी तमन्नाच्या ओळखीची आहे. तमन्नानेच तिला अवैध मार्गाने भारतात प्रवेश करून बंगळूरला येण्यास भाग पाडले. तमन्नाने तिला चोरीच्या मार्गाने भारतात कसे यायचे, याबाबत मार्गदर्शन केले होते. पार्लरमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष मुलीला दाखवले होते. सुरुवातीला मुलगी बंगळूरला रकीब खानकडे आली. तो तमन्नाच्या ओळखीचा आहे. त्याने मुलीकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करवून घेतला. मुलीने नकार दिल्यावर रकीबसोबत तिचा वाद झाला. त्यानंतर मुलगी पुण्यात आली. आरोपी अभिषेक हा देखील तमन्नाचा मित्र आहे. तो शहरातील एका हॉटेलमध्ये काम करतो. त्याने मुलीला बुधवार पेठेत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. मुलीने वेश्याव्यवसायास नकार दिल्यावर तमन्नाने तिला अभिषेकच्या मदतीने सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खोलीत डांबून ठेवले. तिथे अभिषेकने तिला हाताने आणि बेल्टने मारहाण केली तसेच तिला गायब करण्याची धमकी दिली.
मुलीने याबाबत बांगलादेशातील पोलिसांशी मोबाईलवरून संपर्क साधला आणि तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. बांगलादेशी पोलिसांनी ही माहिती त्यांच्याकडील एका सामाजिक संस्थेला दिली. त्यांनी पुण्यातील संबंधित सामाजिक संस्थेशी संपर्क साधला. या सामाजिक संस्थेकडून सहकारनगर पोलिसांना ही माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक गुन्हे सुरेखा चव्हाण यांच्या पथकाने तात्काळ पीडित मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. शुक्रवारी मध्यरात्री २ वाजल्यापासून सकाळी ११ वाजेपर्यंत शोध मोहीम राबवून पोलिसांनी मुलीला डांबून ठेवलेले ठिकाण शोधून तिची सुटका केली. याप्रकरणी, दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त मिलींद मोहीते, सहायक आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ निरीक्षक राहुल गौड, निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सागर पाटील, उपनिरीक्षक कल्पना काळे, पोलीस अंमलदार फिरोज शेख, सद्दाम हुसेन फकिर, मिरा किंद्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.