विशेष प्रतिनिधी
पुणे : सिंहगड रस्त्यावरील तुकाईनगर परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी सई श्रीकांत भागवत हिचा जागीच मृत्यू झाला. सई सर परशुराम महाविद्यालयात कला शाखेत द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती.
सई महाविद्यालयातून दुचाकीवरून घरी परतत होती. तुकाईनगर परिसरात भरधाव ट्रकने तिच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात दीपश्री श्रीकांत भागवत यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध हलगर्जीपणा आणि बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर आरोपी ट्रक चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.