विशेष प्रतिनिधी
पुणे : शहरातील रस्त्यांवर धूळखात पडलेल्या बेवारस वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा, अस्वच्छता आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. अशा काही वाहनांची चोरी झालेली असते, तर काहींना मालकच नसतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन पुणे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेतली असून याची सुरुवात कसबा मतदारसंघातून करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांमध्ये येथील सर्व बेवारस वाहने हटवली जाणार आल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे.
( 4000 abandoned vehicles on the roads of Pune, the traffic branch and the municipal corporation have started a joint operation)
आमदार हेमंत रासने यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियानाच्या माध्यमातून गणेश पेठतील दूधभट्टी चौकामध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी, झोन १ पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह कसबा मतदारसंघातील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील म्हणाले, “पुणे शहरात जवळपास चार हजारांच्यावर धुळखात पडलेली बेवारस वाहने आहेत. यामुळे पार्किंगची समस्या वाढत असून आरोग्यावरही परिणाम होतो. यातील काही वाहने चोरीची असतात तर काहींचे मालक सापडत नाहीत. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार अशा वाहनांच्या मालकांना प्रथम नोटीस दिली जाईल, मात्र कोणी मालक नसल्यास वाहतूक पोलीस गाड्या जप्त करतील आणि पुढे कायदेशीर प्रक्रिया करून लिलाव केला जाईल. कसबा मतदारसंघात पहिल्या दिवशी १३९ वाहने उचलण्यात आली असून येत्या १५ दिवसांमध्ये सर्व बेवारस वाहने हटवण्यात येतील. यासाठी आमदार हेमंत रासने यांची घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे”.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी म्हणाले, “महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यावर धुळखात पडलेली 45 वाहने गेल्या महिन्यात उचलण्यात आली आहेत. महापालिका आणि पुणे पोलिस यांच्यामध्ये समन्वय साधून ही कारवाई केली जात आहे. दोन्ही विभागांकडून रस्त्यावर अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. वाहने जप्त केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यासाठी काही महिने लागत असल्याने ती ठेवण्यासाठी बाणेर येथे महापालिकेची जागा असून कोंढव्यात नवीन जागा उपलब्ध करून देण्यात येईल. खराब झालेल्या महापालिकेच्या वाहनांचा देखील लवकरच लिलाव केला जाणार आहे.
आमदार हेमंत रासने म्हणाले, “बेवारस वाहनांमुळे अस्वच्छता, आरोग्यविषयक समस्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. रस्त्यावर कचरा तसेच बेवारस साहित्य असू नये, हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशी वाहने उचलण्यासाठी पुणे पोलीस, वाहतूक विभाग आणि महापालिकेच्या संयुक्तिक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. वाहने जप्त केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांच्या कालावधी लागत असल्याने तो कमी करण्यासाठी तसेच संपूर्ण प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. कसबा अनधिकृत फ्लेक्समुक्त करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.