विशेष प्रतिनिधी
पुणे: एका कथित शास्त्रज्ञाने प्रेमाचा बहाणा करून आणि लग्नच आमिष दाखवून एका ५० वर्षीय महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला व्यवसायात भागीदारी देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूकही केली.
( 50yearold woman sexually assaulted by alleged scientist )
निशांत जगदीश व्यास या ३७ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न तो पुण्यातील नांदेड सिटी परिसरात राहतो, आरोपीनं ८ एप्रिल २०२३ ते १३ एप्रिल २०२५ या काळात ५० वर्षीय पीडित महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करत तिची आर्थिक फसवणूक केली आहे.
फिर्यादी महिला पुण्यातील वाकड परिसरात एकट्याच राहतात. जानेवारी २०२३मध्ये फिर्यादी यांच्या नातेवाईक मुंबईच्या मुलुंड येथील एका रुग्णालयात कर्करोगाचे उपचार घेत होत्या. त्यावेळी फिर्यादी त्यांच्यासोबत रुग्णालयात राहत होत्या. तेव्हा तिथे आरोपी व्यासही उपचार घेत होता. तेथे झालेल्या ओळखीतून पुढे दोघांची मैत्री वाढत गेली. व्यासने आपण शास्त्रद्न्य असल्याचं पीडितेला सांगितलं. पुण्यात आपली लॅब आहे, असंही त्याने सांगितलं. पुढे ओळख वाढल्यानंतर आरोपीनं पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. दरम्यानच्या काळात लॅबमध्ये भागीदारी देतो असं सांगत पीडित महिलेकडून कोट्यवधी रुपये घेतले, असा आरोप महिलेनं केला आहे. जानेवारी २०२५ मध्ये आरोपी व्यासने फिर्यादी याच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादींचे बोट आणि मनगट मोडले. पोलिसांत तक्रार दिली, तर जीवे मारण्याची धमकीही आरोपीनं दिली होती. याप्रकरणी आता वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.