विशेष प्रतिनिधी
पुणे : पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये
पुणे शहर व जिल्ह्यातील ५८० पर्यटक अडकले आहेत. यापैकी सर्व पर्यटक समूहांशी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाने संपर्क साधला असल्याची माहिती देण्यात आली आहे. ( 580 tourists from Pune stranded in Jammu and Kashmir)
राज्यातील पर्यटकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. या सर्व पर्यटकांना मोफत आणण्याची व्यवस्था करण्यात आली असून, विमानांचा खर्च राज्य सरकार देणार आहे. येत्या दोन दिवसात सर्व पर्यटक पुन्हा पुण्यात परतण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी सांगितले की दहशतवादी हल्ला झाल्यावर रात्री दहा वाजल्यापासून आज ( दि. २३) सायंकाळी सहा वाजेपर्यत ५८० जणांनी कक्षाशी संपर्क साधला आहे. पुण्यातील पर्यटकांची माहिती राज्य शासनाला कळविण्यात आली आहे.आम्ही राज्य शासन व जम्मू काश्मीर प्रशासनाच्या संपर्कात आहोत. तसेच या सर्व पर्यटकांना परत आणण्यासाठीचे नियोजन सुरू असल्याचे ते म्हणाले.
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले. यात पुण्यातील दोन पर्यटकांचा समावेश आहे. संतोष जगदाळे (वय ५४, रा. ज्ञानदीप कॉलनी, कर्वे नगर) व कौस्तुभ गनबोटे (वय ५६, रा. शांतीनगर साळुंखे गार्डन गंगाधाम पुणे) अशी त्यांची नावे आहेत.
कै संतोष व कै. कौस्तुभ यांचे पार्थिव रात्री सव्वा अकरा वाजता लोहगाव विमानतळ येथे आणण्यात येणार आहे. यावेळी राज्य सरकारच्यावतीने राज्य मंत्री माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत. विमानतळावर पार्थिव आल्यावर ससून रुग्णालयातील शीतगृहात ठेवण्यात आले. उद्या सकाळी ( दि.२४) साडेसात वाजता दोघांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार असून, सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पहलगाम aaniजम्मू काश्मीर येथे अडकलेल्या पुण्यातील पर्यटकांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाला पाठविली आहे. दहशतवादी हल्ला झाल्यावर प्रारंभी पुण्यातील पर्यटक सुरक्षित असल्याचे कळले होते. तर दोन पर्यटक जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. संतोष जगदाळे व कौस्तुभ गनबोटे हे या पर्यटकांचे नाव आहे. हे दोघे गंभीर जखमी झाल्यानंतर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे रात्री उशिरा सांगण्यात आले.
संतोष जगदाळे (वय ५४) व कौस्तुभ गनबोटे (वय ५६) हे दोघे मित्र कुटुंबीयांसमवेत कमिन्स कंपनीतील आपल्या मित्रपरिवारासह तीनच दिवसांपूर्वी काश्मीर सहलीला गेले होते. दुपारी ते पहलगाम पाहण्यासाठी गेले असता अचानक आलेल्या दहशतवाद्यांनी जगदाळे यांची मुलगी आसावरी हिच्यासमोर नावे विचारत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले. रात्री उशिरा उपचार सुरू असताना संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. जगदाळे कुटुंबीय कर्वेनगर परिसरात राहतात. गोळीबार झाला तेव्हा जगदाळे यांची पत्नी प्रगती व गनबोटे यांच्या पत्नी संगीताही थोड्याच अंतरावर होत्या. या घटनेने आसावरीसह या दोघींनाही जबर मानसिक धक्का बसला आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांनी हेल्पलाईन / संपर्क क्रमांक त्याच रात्री जाहीर केले. या संपर्क क्रमांकावर रात्री पासूनच एका पाठोपाठ एक फोन चालू होते. यात पहलगाम / जम्मू काश्मीर येथे असलेल्या पर्यटकांनी संपर्क साधून ” आम्ही खूप घाबरलो आहोत. आता आहे त्या ठिकाणी सुरक्षित आहोत, पण आम्हाला लवकर पुण्यात घेईन जा अशी आकांत हाक त्यांनी दिली. केवळ पर्यटक नव्हे तर त्यांच्या शेकडो नातेवाईकांनी येथे संपर्क साधून परतीच्या व्यवस्थेची व आपल्या अडकलेल्या नातेवाईकांची चौकशी केली.
पहलगाम / जम्मू काश्मीर येथे पुणे जिल्ह्यातील कोणी व्यक्ती (पर्यटक) असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनास कळवावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांनी केले होते. सदर माहिती हेल्पलाईन / संपर्क क्रमांक :- 020-26123371 / 9370960061 / 8975232955 / 8888565317 हे क्रमांक जाहीर करण्यात आले. २२ एप्रिल च्या रात्री दहा वाजल्यापासून २३ एप्रिल रोजी सायंकाळी सहा पर्यंत ५८० कॉल आले. दरम्यान पहलगाम / जम्मू काश्मीर येथे अडकलेल्या पुणे शहरातील तसेच जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी याबाबत माहिती दिली.