विशेष प्रतिनिधी
शिर्डी : छगन भुजबळ यांची नाराजी टोकाची नाही. घरात बसून मार्ग काढू शकत नाही, अशी स्थिती नाही. ते पक्षाचे आधारस्तंभ आहेत. 99 व्या साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हापासून ते पक्षाचे फ्रंटलाइन नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच त्यांचं मार्गदर्शन मिळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गतचे नेते प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. छगन भुजबळ यांची नाराजी, त्यांची अधिवेशनाला उपस्थिती यावर प्रफुल पटेल म्हणाले, “छगन भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत. ही घरातली गोष्ट आहे. काल मुंबईत माझी आणि भुजबळ साहेबांची भेट झाली. काही गोष्टी असतात. पण त्यांची नाराजी टोकाची नाही. घरात बसून मार्ग काढू शकत नाही, अशी स्थिती नाहीय. भुजबळ साहेब पक्षाचे आधारस्तंभ आहेत. 99 व्या साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हापासून ते पक्षाचे फ्रंटलाइन नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच त्यांचं मार्गदर्श मिळेल याची मला खात्री आहे
ते म्हणाले, विधानसभेची निवडणूक पार पडली. त्यात राष्ट्रवादीला, महायुतीला प्रचंड यश मिळालं. महाराष्ट्राच्या इतिहासातीत सर्वात जास्त बहुमत असलेलं सरकार स्थापन झालं. या पार्श्वभूमीवर पुढच्या पाच वर्षांची वाटचाल कशी असेल? पक्षाला अजून बळकट कसं करायचं? कार्यकर्त्यांचा उत्साह कसा वाढवायचा? या विषयी विचारमंथन होईल.
पटेल म्हणाले, राजकीय पक्ष सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना काही ना काही दिशा, धोरण याची सूचना करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दीड वर्षांपूर्वी अनेक घडामोडी झाल्या. लोकसभा निवडणुकीत यश मिळालं नाही. पण त्यानंतर विधानसभेला चांगलं यश मिळाले. विधानसभेनंतर आता महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती अशा विविध संस्थांच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मुंबई, दिल्लीशिवाय गाव, जिल्हा नियोजनासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या निवडणुकांसाठी आमचा पक्ष सज्ज राहिला पाहिजे. उद्याची दिशा काय राहील यावर दोन दिवस चर्चा होईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार की महायुती म्हणून? या प्रश्नावर प्रफुल पटेल म्हणाले की, “लोकसभा आणि विधानसभा या दोन मोठ्या निवडणुका असतात. तिथे युती करुन लढणं आवश्यक असतं. पण स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर विशेष करुन जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका इथे कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा असते. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना असतात. त्यामुळे तडजोड करावी लागते. त्यामुळे जिथे शक्य असेल, तिथे महायुती म्हणून लढू. पण समजा एखाद्या ठिकाणी नाही लढलो, तर निवडणूक झाल्यानंतर जिथे महायुती बनवू शकतो, तिथे प्रयत्न करु” जम्मू, हरियाणाप्रमाणे दिल्लीतही भाजपच विधानसभेची निवडणूक जिंकेल असा विश्वास प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.