विशेष प्रतिनिधी
ठाणे : वाल्मिक कराडसह इतर आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुंडे यांनी निवडणुकीसाठी खंडणीतून पैसा गोळा केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बीडमधील मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. सुदर्शन घुले आणि बालाजी तांदळे कृष्णा आंधळे, प्रतीक घुले, विष्णू चाटे यांच्याबरोबर वाल्मीक कराडही दिसत आहे. त्यावर आव्हाड म्हणाले, हा 24/09/2024 चा व्हिडीओ आहे,l. हे खंडणीचं प्रकरण नाही. ही खंडणी नव्हतीच तर हा इलेक्शन फंड होता. त्या काळात इलेक्शनसाठी लागणारा पैसा हा असा खंडणी आणि दादागिरीतून वसुल केला जात होता . सर्वात धक्कादायक म्हणजे यात एक पोलीस दिसत आहे, मी वारंवार आरोप करतोय की पोलीस यंत्रणा आणि वाल्मिक कराड आणि तेव्हाचे पालकमंत्री यांची हातमिळवणी आणि वाढलेली गुन्हेगारी हे सूत्र आहे, या सूत्राकडे सरकार लक्षच द्यायला तयार नाही.
आता तुम्हाला यापेक्षा मोठा काय पुरावा हवाय असा सवाल करून आव्हाड म्हणाले, पोलीस, वाल्मीक कराड आणि खुनातील सर्व आरोपी एकत्र दिसतायत. तरी देखील सरकार म्हणतं असेल की आम्हाला पुरावेच सापडत नाहीत तर काय करायचं ? या सर्व गुन्ह्यांमध्ये राजेश पाटील नावाचा जो गुंड पोलीस अधिकारी आहे त्याला आरोपी करा, मास्टर माईंड आणि मास्टर माईंडचा माईंड गेम सेट करणारा हा राजेश पाटील आहे. सरकारने आता योग्य तो निर्णय घ्यावा आता सरकारने कशाची वाट बघायची ?
अक्षय शिंदे एन्काउंटरवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यावर आव्हाड म्हणाले, काल अक्षय शिंदे उघडा पडला. सरकारला जो काय रॉबिन हूड व्हायचं होत ते रॉबिन हूड उघड पडलं. अक्षय शिंदेच्या प्रकरणात संजय शिंदे नावाचा पोलीस आहे त्याला गाडीत बसवला कोणी? संजय शिंदे बरोबर चर्चा केली कोणी? ज्याने संजय शिंदे सोबत चर्चा केली तो अधिकारी कोण होता? तुम्हाला माहित नसेल तर पुढच्या आठ दिवसात मी नावं सांगतोया अशा गोष्टींमुळे महाराष्ट्र पोलिसांची खाकीतली दादागिरी संपत चालली आहे. मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रात भाई, डॉन एकच, दादागिरी एकाचीच चालणार ती म्हणजे पोलिसांची. जे नवीन जन्माला येत आहेत ते राजकीय हस्तक आहेत आणि या राजकीय हस्तकांसोबत आपली गणितं सेट करणं हे महाराष्ट्राला महागात पडणार आहे. आता हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या हातात गेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यावा. अक्षय शिंदे, संतोष देशमुख प्रकरण हा हप्त्याचा व्हिडीओ यातून पोलीस कुठपर्यंत गुन्हेगारी करण्यापर्यंत सहभागी झालेत याचं उत्तम उदाहरण आहे,l. हे बंद करा नाही तर महाराष्ट्र खड्ड्यात जाईल
बांगलादेशी मुद्यावर ते म्हणाले, किरीट सोमय्या एवढी वर्ष ओरडत आहेत, काय करायचं आहे ते करा पण बाहेर काढा ना. त्यांना रोज दुसरं काहीच दिसत नाही. उठसुठ बांगलादेशी, माझं म्हणणं आहे एकदाच पकडून मारा, झोडा, गोळ्या मारा. कोणी अडवलं आहे तुम्हाला. आम्ही अडवलं आहे का? ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे हे काम करतात हे कॉन्ट्रॅक्टर कोणाचे आहेत? प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं नसतं. म्हणून आम्ही सोडून देतो. बाते चलेगी तो बहुत दूर तक जाएगी . सत्तेत तुम्ही दहा-दहा वर्ष, केंद्रात सत्तेत तुम्ही बारा वर्ष तरी तुम्ही शरद पवारांकडे बोट दाखवता.
उदय सामंत यांच्यावर ते म्हणाले, उदय सामंत तसे आता वरच्या लेवलला आहेत. ते कोणाच्या संपर्कात आहे ते तपासा. उद्धव ठाकरे यांच्या बाजूला असताना ते कसे, कुठून निघून गेले ते तपासा. त्यांना कोणाचा फोन आला ते तपासा. आजही कोणाचे ऐकतायत ते तपासा. महाराष्ट्रात राजकारणाचा उलगडा करावा .