विशेष प्रतिनिधी
नागपूर : बीड म्हणजे भ्रष्टाचाराचा नवीन पॅटर्न आहे. बीडमध्ये गुंडगिरीला बळ मिळून निर्दोष व्यक्तींना आपला जीव गमावावा लागला. आता हे सर्व मुळासकट उखडून टाकण्याची गरज आहे. तरच बीड स्वच्छ होईल, अशी टीका कॉंग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, वाल्मिक कराड कोठडी प्रकरण भयावह आहे,. बीडमध्ये अलीकडे ज्या घटना समोर येत आहेत त्या भीषण आहेत. सध्या तपासाची दिशा योग्य आहे असे मी मानतो. मात्र त्यासाठी विलंब झाला, कारण त्यात लोकप्रतिनिधी सहभागी होते. वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. मात्र पोलिसांनी पोलीस कोठडी मागितली असती, तर नवीन प्रकरण उजेडात आले असते. सध्या मुख्यमंत्र्यांची भूमिका मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर अशीच दिसून येत आहे. सुरेश धस वेगळं म्हणतात. अजित पवार वेगळं म्हणतात, या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे हात एवढे गुंतलेले असताना कारवाई करण्यासाठी दिरंगाई का केली जात आहे? हा प्रश्न निर्माण होत आहे.
महाविकास आघाडीतील आमदार-खासदार महायुतीकडे जाणार असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. यावर त्यांना टोला मारताना विजय वडेट्टीवार म्हणाले, उदय सामंत यांना शुभेच्छा आणि ईश्वराला प्रार्थना की त्यांच्या पदाला धोका निर्माण होऊ नये. मुळात आजकाल असे हास्यास्पद स्टेटमेंट सत्ताधारी पक्षाकडून येऊ लागले आहेत उदय सामंत यांचे मत भाजपची एकहाती सत्ता बनावी असे आहे का? असेच आम्हाला त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे .
राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू वाहून नेणाऱ्या ट्रककडे दुर्लक्ष करा अशा सूचना केल्या आहेत. त्यावर वडेट्टीवर म्हणाले, आता ते महसूल मंत्री नाहीत. त्या दुःखातून त्यांनी हे वक्तव्य दिले असेल.
लाडकी बहीण योजनेवर ते म्हणाले, सर्व बनवाबनवी व बोगसगिरी आहे. पीएम किसान योजनेमधूनही लोकांना असेच बाहेर केले, आता फक्त 1 लाख 10 हजार लोकांना तो निधी मिळतो आहे. काही दिवसांनी तो 60 हजार पर्यंत खाली येईल आणि अशी स्थिती लाडकी बहीण योग्य संदर्भात होईल आणि अर्ध्या अधिक महिलांचे नाव वगळले जातील, नवीन अटी शर्ती लावून महिलांची नावे कमी केली जाते. 2100 रुपयांचे वचन ते पूर्ण करू शकणार नाही म्हणून लाडक्या बहिणींनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बदला घेण्यासाठी तयार राहावं आणि मतदानाने या राक्षसांचा नायनाट करावा अशी आम्ही बहिणींना विनंती करतो.