विशेष प्रतिनिधी
पुणे : विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करणारा “सन्मान स्त्री शक्तीचा” सोहळा कसबा मतदारसंघात मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून भाजपच्या वतीने आयोजित या सोहळ्याला जवळपास पंधरा हजारांच्यावर महिलांनी उपस्थिती लावली. पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. (In the presence of 15 thousand women in the Kasaba, the celebration of “Sanman Shri Shakti” was celebrated with great enthusiasm)
आमदार हेमंत रासने आणि मृणाली रासने यांच्या माध्यमातून गेली दहा वर्षांपासून अखंडितपणे सन्मान स्त्री शक्तीचा गौरव सोहळा आणि भव्य हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात येते. बाजीराव रोडवरील नातूबाग मैदानावर यंदा हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. पुणे महापालिकेच्या पहिल्या महिला नगरसचिव योगीता भोसले, विश्वकप विजेता महिला खो-खो संघाच्या प्रशिक्षिका प्राची वाईकर, पत्रकार मीनाक्षी गुरव, समाजसेविका शर्मिला सय्यद, साहित्य क्षेत्रासाठी वसुंधरा काशीकर आणि आंतरराष्ट्रीय नृत्यांगना वैष्णवी पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले, “अनादी काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना नेहमी शक्ती आणि देवीचे रूप मानले जाते. आजच्या एकविसाव्या शतकात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याने ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी गेल्या १० वर्षांपासून हा सोहळा अविरतपणे आयोजित केला जात आहे. समाजामध्ये काम करताना महिलांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे, याच उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. या निमित्ताने हजारोंच्या संख्येने महिलावर्ग एकत्र येत असल्याचा आनंद आहे”.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, चंद्रकांत पोटे, उमेश अण्णा चव्हाण, वैशालीताई नाईक, राणीताई कांबळे, महिला आघाडी अध्यक्ष अश्विनीताई पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष निलेश कदम यांनी परिश्रम घेतले. निवेदन सुपेकर यांनी केले.