विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील अमली पदार्थ तस्करांवर कडक कारवाईस सुरुवात झालीअसून ‘मिशन झीरो टॉलरन्स ऑफ ड्रग्ज’ मार्फत तस्करांवर ‘स्ट्राईक’ करण्यास सुरुवात झाली आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक एक व दोनच्या वतीने करण्यात आलेल्या तीन कारवायांमध्ये २५ लाख ५१ हजारांचे मेफेड्रोन आणि गांजा जप्त करण्यात आला आहे. ( Mission Zero Tolerance of Drugs’, Mephedrone and ganja worth 25 lakhs seized in Pune, four arrested)
कुमेल महम्मद तांबोळी (वय २८, रा. सुखकर्ता अपार्टमेंट, गोकुळनगर, धानोरी), सैफन ऊर्फ शफिक इस्माईल शेख (वय ५२, रा. आनंदनगर, मार्केट यार्ड), किरण भाऊसाहेब तुजारे (वय २४, रा. श्री बिल्डींग, आव्हाळ वाडी, वाघोली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तांबोळी याच्याकडून १९ लाख १७ हजार ३०० रुपयांचे ८३ ग्रॅम मेफेड्रोन तसेच अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व सहकारी गस्तीवर असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना खबऱ्यामार्फत आरोपीची माहिती मिळाली होती. त्यानुसार, लोहगाव वाघोली रस्त्यावरील संतनगर येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस अंमलदार अझिम शेख यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून बिबवेवाडी रस्त्यावरील आनंदनगरमध्ये राहणाऱ्या सैफन ऊर्फ शफिक शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७ हजारांचा ३५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुध्द मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे पथक गस्तीवर असताना पोलीस अंमलदार संदिप शिर्के यांना आरोपी किरण तुजारे याच्याबाबत माहिती दिली. त्यानुसार, विमाननगर चौकाकडून श्रीकृष्ण हॉटेल चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावण्यात आला. किरण तुजारे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ६ लाख २७ हजार रुपयांचे ३० ग्रॅम ३५ मिलिग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. त्याच्याविरुध्द विमानतळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.