विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे परिसरात जीबीसचा (गुईलेन बॅरे सिंड्रोम) धोका वाढत चालला आहे. या आजारामुळे पिंपळे गुरव परिसरातील एका ३६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ‘जीबीएस’नंतर या रुग्णाला न्यूमोनियाचीही लागण झाली होती. ( Another victim of GBS, youth dies in Pimpri-Chinchwad)
पिंपळेगुरव परिसरात वास्तव्यास असलेल्या ३६ वर्षीय युवकाला २१ जानेवारी रोजी गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. या रुग्णावर महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. या रूग्णाला गुईलेन बॅरे सिंड्रोम नंतर न्यूमोनियाचीही लागण झाली होती. उपचारादरम्यान ३० जानेवारी रोजी या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. युवकाचा मृत्यू नेमका कोणत्या आजारामुळे झाला, उपचारात हयगय झाली का, याची चौकशी करण्यासाठी वायसीएमने समिती स्थापन केली होती.
गुईलेन बॅरे सिंड्रोमनंतर या रुग्णाला न्यूमोनियाही झाला होता. न्यूमोनियामुळे श्वसनसंस्थेवर आघात झाला. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने आणि गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराने मृत्यू झाल्याची कारणे समितीने दिली आहेत.
दरम्यान, २५ जानेवारी रोजी गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराची लागण झालेल्या पिंपरीतील एका ६७ वर्षीय महिलेचा न्यूमोनिया, श्वसनक्रिया बंद पडणे, रक्तात संसर्ग पसरल्याने मृत्यू झाला होता. या महिलेवर अडीच महिन्यांपासून उपचार सुरू होते. ‘जीबीएस’मुळे मृत्यू झाला नसल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला होता.
शहरात आजपर्यंत १३ रुग्ण गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचे आढळले होते. त्यापैकी काही रुग्ण बरे झाले आहेत. तर, काहींवर उपचार सुरू आहेत.
रुग्ण कॅब चालक असल्याने त्याला पुण्यातून या आजाराची लागण झाली असल्याचा संशय आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. तसेच शहरातील पाण्यात कोणत्याही प्रकारचे दूषित विषाणू आढळून आले नसल्याचा दावा देखील पिंपरी चिंचवड आरोग्य – वैद्यकीय विभागाने केला आहे.