विशेष प्रतिनिधी
नाशिक :वेशांतर करून पाळत ठेवत नाशिक पोलिसांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधात मोठी कारवाई करत ८ घुसखोरांना अटक केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ( Police action against illegal Bangladeshi intruders in Nashik)
नाशिक पोलिसांकडून काही दिवसांपासून अवैध बांगलादेशी नागरिक शोध मोहीम सुरू होती. याच पार्श्वभूमीवर, नाशिकमधील एका बांधकाम साईटवर ६०० कामगार कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. संशयित व्यक्तींची चौकशी केल्यानंतर त्यात काही बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. एक बांगलादेशी नागरिक १२ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये आला होता अटक केलेल्या ३ बांगलादेशी नागरिकांकडे भारतीय कागदपत्रे आढळून आली आहेत.
गेल्या ४-५ दिवसांपासून नाशिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वेशंतात पाळत ठेवली होती. अखेर कारवाई करत ८ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. या घुसखोरांकडून बांगलादेशी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, अटक केलेल्या तिघांकडे भारतीय आधार कार्ड आणि पॅनकार्ड देखील सापडले असून, हे कागदपत्रे कोणी बनवून दिली, याचा तपास सुरू आहे.
प्राथमिक चौकशीत या नागरिकांनी केवळ पैसे कमावण्यासाठी भारतात आल्याचे स्पष्ट झाले आहे. बांगलादेशी एजंट्स त्यांना प्रथम कलकत्त्यात पाठवतात, तेथे त्यांना भारतीय बनावट कागदपत्रे मिळवून देऊन देशभरात पाठवले जाते. मिळवलेले पैसे कलकत्त्यातील बँकांमार्फत बांगलादेशला पाठवले जातात. नाशिकमध्ये हे कामगार लेबर कॉन्ट्रॅक्टरमार्फत पोहोचले होते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि इतर सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली आहे. या बांगलादेशी नागरिकांना नाशिकमध्ये कोणी आश्रय दिला? त्यांच्या बनावट कागदपत्रांसाठी कोणी मदत केली? याचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या नागरिकांकडे मिळालेल्या पत्ते नाशिक जिल्ह्यातील नसून अन्य ठिकाणचे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही संपूर्ण कारवाई आडगाव पोलीस ठाण्याअंतर्गत पार पडली पोलिसांनी आणखी बांगलादेशी घुसखोर शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.