विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: दिल्लीचा जनादेश स्पष्ट आहे, आज दिल्लीt विकास, दृष्टीकोन आणि विश्वास यांचा विजय झाला आहे. आज अराजकता, अहंकार आणि दिल्लीवरच्या आपदा यांचा पराभव झाला आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर केला. ( Chaos, Arrogance and Aapda in Delhi, Prime Minister’s Attack on Kejriwal)
दिल्ली विधानसभेत भाजपचा देदीप्यमान विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, या निकालाने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस केलेली मेहनत काय आहे ते दाखवून दिलं. तुम्ही सगळे कार्यकर्तेही या विजयाचे वाटेकरी आहात. मी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या विजयाच्या शुभेच्छा देतो. दिल्लीच्या जनतेने हे स्पष्ट केलं आहे की, दिल्लीची मालकी ही फक्त आणि फक्त जनतेकडे आहे. ज्या लोकांना दिल्लीचे मालक असण्याचा अहंकार होता त्यांना वास्तवाची जाणीव दिल्लीकरांनी करुन दिली.
दिल्लीच्या जनादेशाने हे स्पष्ट केलं की राजकारणात शॉर्टकटसाठी, भ्रष्टाचारासाठी, खोट्या गोष्टींसाठी काहीही जागा नाही. जनतेने शॉर्टकर्टच्या राजकारणाचं शॉर्ट सर्किट केलं. दिल्लीच्या लोकांनी, लोकसभेच्या निवडणुकीत मला निराश केलं नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ या तिन्ही निवडणुकांमध्ये दिल्लीकरांनी भाजपाच्या सातच्या सातही जागा दिल्या. तीनवेळा लोकसभा निवडणुकीत भाजपाला दिल्लीने शतप्रतिशत विजय मिळवून दिला. मात्र मी पाहात होतो की देशभरातल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात आणि दिल्ली भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात एक खंत होती. ती खंत दिल्लीची पूर्णपणे सेवा करता येत नाही हीच होती. आज दिल्लीने आमचा तो आग्रहही मानला.
दिल्लीच्या तरुणांनी आम्हाला साथ दिली आहे. दिल्लीत आज लागलेला निकाल हे दाखवून देतो आहे की भाजपाच्या डबल इंजिन सरकारवर देशाचा किती विश्वास आहे. लोकसभेतल्या विजयानंतर आम्ही सर्वात आधी हरियाणात अभूतपूर्व विजय मिळवला. त्यानंतर महाराष्ट्रात नवा रेकॉर्ड केला, आता दिल्लीत नवा इतिहास रचला गेला आहे असंही मोदी म्हणाले आहेत. आपलं दिल्ली हे काही फक्त शहर नाही तर मिनी हिंदुस्थान आहे. दिल्ली हा लघुभारत आहे. दिल्ली एक भारत, श्रेष्ठ भारत हा विचार घेऊन जगणारं शहर आहे असंही नरेंद्र मोदी म्हणाले.