विशेष प्रतिनिधी
वॊशिंग्टन : वाटाघाटी करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणीही हात धरू शकत नाही. यामध्ये ते माझ्यापेक्षा कितीतरी पटींनी उत्तम आहेत, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचे कोतुक केले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
मोदी-ट्रम्प यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने ट्रम्प यांना विचारले की, तुम्ही नेहमीच पंतप्रधान मोदींना चांगले वाटाघाटीकार (नेगोशिएटर) म्हणता, पण आजच्या वाटाघाटीत कोणी कोणावर मात केली? या प्रश्नाला उत्तर देताना सुरुवातीलाच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हसले आणि म्हणाले, “वाटाघाटी करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणीही हात धरू शकत नाही. यामध्ये ते माझ्यापेक्षा कितीतरी पटींनी उत्तम आहेत.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड रूट (व्यापारी मार्ग) देखील जाहीर केला. त्यांनी सांगितले की, दोन्ही देश या व्यापार मार्गाच्या निर्मितीसाठी काम करत आहेत. हा मार्ग भारतात सुरू होऊन नंतर इस्रायल, इटली आणि अमेरिकेपर्यंत येईल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला एफ-३५ लढाऊ विमाने पुरवण्याची घोषणाही केली आहे. “या वर्षापासून, आम्ही भारताला अब्जावधी डॉलर्सची लष्करी सामग्री विक्री करणार आहोत. आम्ही भारताला एफ-३५ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्याचा मार्गही मोकळा करत आहोत,” असे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प आणि मोदी यांच्यात अमेरिकेत भारताचे आणखी दोन नवीन दूतावास सुरू करण्याबाबत एक मोठी घोषणाही करण्यात आली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “लवकरच बोस्टन आणि लॉस एंजेलिसमध्ये दोन दूतावास सुरू होणार आहेत. या दूतावासांमुळे भारत आणि अमेरिकेतील जनतेशी असलेले संबंध अधिक मजबूत होतील.” अमेरिकेत राहणारे भारतीय आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत यावरही पंतप्रधानांनी यावेळी भर दिला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “दोन्ही देशांनी २०३० पर्यंत त्यांचा द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे दोन्ही देशांना फायदा होईल. या व्यापार कराराला अंतिम रूप देण्यासाठी दोन्ही देश काम करत आहेत.”
तेल आणि गॅस खरेदीबाबत एक मोठा करार झाला आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “अमेरिका भारताचा सर्वात मोठा तेल आणि गॅस पुरवठादार बनणार आहे. यामुळे ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य ऐतिहासिकदृष्ट्या वाढणार आहे.