विशेष प्रतिनिधी
मुंबई : एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही, मात्र आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देतो’ असे वक्तव्य केल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याची तुलना थेट भिकाऱ्याशी केल्याची टीका होत आहे. यावर कोकाटे यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं स्पष्टीकरण देत माध्यमांवर खापर फोडले आहे.
विरोधक माझ्या त्या वक्तव्यावर टीका करणारच आहे, त्यांना तेवढी संधी पाहिजे, मी केलेलं वक्तव्य त्यांना तरी कळलं का? विरोधी पक्ष ते त्यांच्या पक्षाची बाजू मांडणार आहे पण तुम्ही जे मांडले ते चुकीचं मांडलं त्याच्यामुळे अशा प्रतिक्रिया येत आहे. मी असं म्हटलं की, एक रुपयांमुळे बाहेरच्या कंपन्यांचे गैरप्रकार वाढले, बाहेरच्या कंपन्यांनी त्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरले, त्यामुळे एक रुपयात विमा स्वस्त असल्याने त्या कंपन्यांनी गैरफायदा घेतला, हा गैरफायदा घेऊ नये म्हणून विम्याच्या संदर्भामध्ये आम्ही पुनर्विचार करत आहे. त्यामध्ये अभ्यास करून धोरण ठरवू, पण प्रसारमाध्यामांनी माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवलं आणि लोक गैर अर्थ काढतात’ असं म्हणत कोकाटेंनी माध्यमांवरच खापर फोडलं.
मी सकाळी एक बोललो, तुम्ही काही तरी वेगळं चालवत आहे. मी बाईट द्यायचा की नाही. मी वक्तव्य काय केलं, हे तुम्ही चुकीचं दाखवलं. मुळात माझं तसं वक्तव्य नव्हतंच. मी असं काही बोललोच नाही. मुळात एक रुपया विमामध्ये गैरप्रकार वाढले. बाहेरच्या कंपन्यांनी अर्ज भरले. ४ लाख लोकांचे अर्ज बेकायदेशीर ठरले. १ रुपया विमा स्वस्त असल्यामुळे कंपन्यांनी अर्ज भरले. त्या लोकांनी गैरफायदा घेतला. त्यामुळे आम्ही पूर्नविचार करणार आहोत. पण तुम्ही चुकीचा अर्थ काढून दाखवलं. एक रुपयाच्या विमामुळे जे सीएसटी केंद्र धारक आहे त्यांना चाळीस रुपये मिळतात आणि शेतकऱ्यांना एक रुपया भरावा लागतो त्यामध्ये सीएसटी केंद्राच्या लोकांनी गोंधळ केला आहे, असंही कोकाटे म्हणाले.