विशेष प्रतिनिधी
जालना : ठेकेदार विकासकामे न करता फक्त बिले सादर करून पैसे उचलत आहेत, असा धक्कादायक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. सातव्या वेतन आयोगाचे लाभ घेता पण जबाबदारी घेत नाही याबद्दल शासकीय अधिकाऱ्यांचीही त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली.
परतूर येथे आयोजित एका कार्यक्रमात जालना जिल्ह्यातील विकासकामांच्या दर्जाबाबत आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली .
ठेकेदारांच्या कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल चिंता व्यक्त करताना पवार म्हणाले,अनेक ठेकेदार विकासकामे न करता फक्त बिले सादर करून पैसे उचलत आहेत. काम न करता बिले सादर करून पैसे काढले जात आहेत. असे लोक माझ्या पक्षात येऊ नयेत.
सरकारी अधिकाऱ्यांना आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन करताना पवार म्हणाले, राज्य सरकार कोट्यवधी रुपये वेतन आणि पेन्शनवर खर्च करते, परंतु तरीही दर्जेदार काम होत नाही. आम्ही सातवा वेतन आयोग लागू केला, आणि आता आठवा वेतन आयोग आणणार आहोत. तरीही जबाबदारी का घेतली जात नाही?”
जालना येथील नवीन बांधलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भेटीदरम्यान, पवार यांनी निकृष्ट कामाबद्दल संताप व्यक्त केला. सरकारी विश्रामगृहात डासांचा त्रास असल्याने तिथे न थांबता खाजगी सुविधेचा वापर करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी (GMCH) आर्थिक मदतीची घोषणा करताना, पवार यांनी स्वच्छतेबद्दल चिंता व्यक्त केली आणि रुग्णालयाच्या परिसरात थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले, “लोक रुग्णालयात थुंकत आहेत. अशा वर्तनावर कारवाई झाली पाहिजे. सीसीटीव्ही कॅमेरे लावून दोषींना पकडा.
या कार्यक्रमात, माजी आमदार सुरेश जेठलिया यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.