विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाला बळीचा बकरा’ बनवले जात आहे. निवडणुकीत पराभूत झालेले निवडणूक आयोगावर अन्यायकारकपणे आरोप करत आहेत, अशी खंत निवृत्त होणारे मुख्य निवडणूक आयुक्तराजीव कुमार यांनी सोमवारी आपल्या निरोपाच्या भाषणात व्यक्त केली. ( Don’t scapegoat the commission, said former Chief Election Commissioner Rajeev Kumar, who questioned the election process)
काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकाल यांवरून निवडणूक आयोगावर आरोप केले होते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष निवडणूक आयोगावर ईव्हीएम च्या संदर्भात सतत आरोप करत आहे. राजीव कुमार हे सोमवारी निवृत्त झाले. आपल्या निरोपाच्या भाषणात ते म्हणाले, निवडणूक आयोग या संस्थेला निवडणुकीच्या निकालांना न जुमानणाऱ्यांकडून वारंवार दोष दिला जातो. निवडणूक अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याची प्रवृत्ती वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. पराभव स्वीकारण्यास तयार नसलेल्यांकडून आयोगावर आरोप करणे सोपे वाटते.
निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर उमेदवार आणि त्यांचे पक्ष पूर्ण पारदर्शकतेने सहभागी असतात. निवडणुकीदरम्यान कुठलाही आक्षेप नोंदवला गेला नाही किंवा अपील दाखल करण्यात आले नाही, तर निवडणुकीनंतर संशय व्यक्त करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.
निवडणुकीतील पराभवानंतर निवडणूक आयोगाला दोष देण्याच्या प्रथेला पूर्णविराम द्यावा, असे आवाहन करत राजीव कुमार म्हणाले, संवाद हा नेहमीच सर्वोत्तम मार्ग असतो. आयोग संयम आणि शहाणपणाने परिस्थिती हाताळतो. मात्र ही प्रवृत्ती चिंताजनक असून ती लवकरच थांबली पाहिजे.
निवडणूक आयोगावर भारतीय जनता पक्षाला (BJP) सहानुभूती दाखवल्याचा आरोप सातत्याने केला जातो. मात्र, आयोगाने हे आरोप वारंवार आणि ठामपणे फेटाळले आहेत.7 फेब्रुवारी रोजी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी असा दावा केला की, एप्रिल-जून 2024 मधील लोकसभा निवडणुकीपासून नोव्हेंबरमधील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत राज्यातील पात्र मतदारसंख्या 39 लाखांनी वाढली आहे.