विशेष प्रतिनिधी
पुणे : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर थोडासा करताना त्यांनी पुन्हा एकदा सुचक विधान केल्यामुळे राजकीय चर्चा रंगली आहे. रवींद्र धंगेकर काँग्रेसमध्ये राहतात की शिवसेनेचे शिंदे गटात प्रवेश करतात याबाबत उत्सुकता वाढली आहे. ( Another indicative statement by Ravindra Dhangekar on the talk of defection)
येत्या सोमवारी किंवा मंगळवारी कार्यकर्त्यांसोबत बोलणार आहे. यंत्रणेला टक्कर द्यायची तर मैत्री वाढवावीच लागणा आहे. अधिकारी सत्तेचे गुलाम असतात. जाताना लपून जाणार नाही,असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.
शहर काँग्रेसमध्ये सध्या गटबाजी आणि अंतर्गत राजकारणामुळे अस्वस्थता आहे. पक्षाने अलीकडेच विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या. परंतु या यादीतून धंगेकरांना डावलण्यात आले. विशेषतः कसबा मतदारसंघाच्या जबाबदारीसाठी त्यांना विचारण्यात आले नाही. कसब्याच्या निरीक्षकपदाची जबाबदारी पक्षातील नेते आणि महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे विद्यमान सरचिटणीस अभय छाजेड यांच्यावर सोपवण्यात आली. कसब्यात डावलण्यात आल्याने धंगेकर अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर धंगेकर शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा असल्याने त्यांच्यावर जबाबदारी सोपवली नाही का? असा सवाल देखील उपस्थित होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले होते की पुण्यातही ऑपरेशन टायगर वेगाने राबवले जाईल. या पार्श्वभूमीवर धंगेकर यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना वेग आला आहे. त्यातच त्यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर भगवा परिधान केलेला फोटो शेअर केला. त्यासोबत ‘शहा का रुतबा’ हे गाणे लावले. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत.
यावर रवींद्र धंगेकर म्हणाले,हा रिल टाकायचा माझ्या डोक्यातला विषय नाही. बऱ्याच दिवसांनी माझा चांगला फोटो आला. त्यामुळे टाकला. मी आजारी होतो त्यामुळे तब्येत कमी झाली होती. त्या दिवशीचे अनेक फोटो आहेत. माझे सगळ्यांसोबत चांगले संबंध आहेत. अजितदादा यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. आपला जन्म भगव्या उपरणातच झाला आहे. मी हिंदू धर्मात जन्मलो आहे. आपला मित्र आपल्यासोबत असावा, असे अनेकांना वाटतं. ऑफर देण्यात काहीही चूक नाही. मी आज कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. मी काँग्रेसमध्ये काम केलंय. काँग्रेस पक्ष प्रचंड चांगला आहे.
माझं सोशल मिडिया कार्यकर्ते मॅनेज करतात. मी काँग्रेसमध्ये चांगल काम केलं आहे. हा चांगला पक्ष आहे. गेल्या 2-3 महिन्यांत मी आमदार नसल्यामुळे मला जास्त कुणी भेटायला येत नाही. कार्यकर्त्यांसोबत मला बोलावच लागणार आहे. भगवं टाकलं काही हरकत नाही, मात्र माणुसकी आपला धर्म आहे. दुष्मनालाही आपण मदत करतो. मी कार्यकर्त्यांसोबत बोलतो. पण जाताना मी लपून जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.