विशेष प्रतिनिधी
मुंबई: विधानसभा सदस्य म्हणून एखाद्या मंत्र्याला त्यांच्या विभागाच्या कामासंदर्भात भेटणे हे काही गैर नाही. तरीही प्रसारमाध्यमे अशा प्रकारच्या बातम्या बनवितात हे खेदजनक असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. ( No political meeting with Bawankule, Jayant Patil criticizes media)
जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट घेतली. त्यांच्यात तासभर चर्चा झाली अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. यावरून नवीन राजकीय समीकरणे जुळून राजकीय भूकंप येणार असेही म्हटले जात आहे. मात्र या भेटीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाल्याच्या आरोपाची जयंत पाटील यांनी खंडन केले आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी संध्याकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली. सांगली जिल्ह्यातील काही महसूल प्रश्नांवर 10-12 निवेदनं देण्यात आली. या भेटीसाठी आगाऊ वेळ घेण्यात आली होती. महसूल विभागात काही गोष्टी ऑनलाईन केल्याने त्याचा शेतकर्यांना त्रास होत आहे, त्याकडे बावनकुळे यांचे लक्ष वेधल्याचे पाटील म्हणाले. ही भेट 25 मिनिटांची होती. भेटीवेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पण उपस्थित होते, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझी मध्यरात्री भेट झाली, अशा अर्धवट बातम्या प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत आहेत.वास्तविक मी सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या प्रश्नांच्या बद्दल महसूलमंत्री बावनकुळे यांची वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. यामध्ये आष्टा येथील ४,६,९ जमिनींचे प्रश्न, आष्टा अप्पर तहसील कार्यालय इमारत प्रश्न, चांदोली वारणा धरणग्रस्तांचे प्रश्न, जमिनीवरील शेतकऱ्यांचे प्रश्न, सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भूसंपादनाचे प्रश्न अशा विविध प्रश्नांचा समावेश होता. बावनकुळे यांनी संध्या. ६ ची वेळ दिली होती मात्र ते सुनावणीमध्ये असल्याने त्यांना यायला उशीर झाला. त्याच वेळी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील त्यांच्या काही कामानिमित्ताने बावनकुळे यांना भेटायला आले असल्याने तिथे उपस्थित होते.” असे पाटील यांनी स्पष्ट केले.