विशेष प्रतिनिधी
पुणे : स्वारगेट बलात्कार घटनेतील आरोपीच्या शोधासाठी आठ पोलीस पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण आणि स्वारगेट भागात आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. आरोपीचा सीडीआर काढला असल्यामुळे लोकेशननुसार त्याचा माग काढला जात आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.
मंगळवारी पहाटे स्वारगेट एसटी स्टॅडवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. आरोपीने गोड-गोड बोलून पीडित तरूणीला आपल्या जाळ्यात ओढले आणि नंतर बसमध्ये गेल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर सध्या आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. त्यामुळे अनेक तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमधून मुली पुण्यात शिकायला येत असतात. पुण्यात मुली कायम सुरक्षित राहिल्या आहेत. कारण पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटत असतं. पण स्वारगेट येथे घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. संबंधित मुलीवर अत्याचार करून आरोपी फरार झाला आहे.
पीडित मुलीने सकाळी साडे नऊ वाजता पोलिसांत तक्रार नोंदवली. अत्याचाराची घटना असल्याने पोलीस जातीने या प्रकरणात लक्ष घालत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेने केलेल्या वर्णनानुसार आरोपीची माहिती गोळा केली जात आहे.
पीडित तरूणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी पहाटे 5.30 वाजताच्या दरम्यान स्वारगेट बसस्थानकावर आली होती. यावेळी एका व्यक्तीने पीडित तरुणीला बस दुसऱ्या ठिकाणी लागल्याचे सांगितले. तरुणीने त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून ती दुसऱ्या बसमध्ये जाऊन बसली. तिथे व्यक्तीने पीडिती तरूणीवर जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव आहे. गाडे हा कुख्यात आरोपी असून तो जामिनावर बाहेर आल्याचे बोलले जात आहे. आरोपीवर शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे. पोलीस फरार दत्तात्रय गाडे याचा शोध घेत आहेत.
आपली माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका. सोशल मीडियावर कोणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असेल तर त्यावर काळजी घ्या. आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे, हे लक्षात ठेवा असे चाकणकर म्हणाल्या.