विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वारगेट बलात्कार प्रकरणात पीडित ओरडली नाही, प्रतिकार का केला नाही असा सवाल केल्याने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर चोहोबाजूने टीका होत आहे. मात्र आता आपल्या या वक्तव्याचे योगेश कदम यांनी पोलिसांवर बिल फाडले आहे. अत्याचार होत असताना कोणी त्या बहिणीला वाचवण्यासाठी का गेले नाही? हा प्रश्न मला पडला. तो प्रश्न मी पोलिसांना विचारला. त्यावेळी पोलिसांनी दिलेले उत्तर मी माध्यमांना दिले, असे ते म्हणाले. (The Minister of Home Affairs blame Pune Police for his insensitive statements!)
स्वारगेट बसस्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराबाबत ती पीडित तरुणी ओरडली का नाही? असा प्रश्न योगेश कदम यांनी उपस्थित केला. यावरून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. राजीनाम्याची मागणीही विरोधकांकडून होत आहे. योगेश कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा केला. ते म्हणाले, स्वारगेटला गेल्यावर मला लक्षात आले की त्या ठिकाणी प्रचंड रहदारी आहे. नेहमी वर्दळ असणारी ती जागा आहे. त्या ठिकाणी आमच्या बहिणीवर अत्याचार होत असताना कोणी त्या बहिणीला वाचवण्यासाठी का गेले नाही? हा प्रश्न मला पडला. तो प्रश्न मी पोलिसांना विचारला. त्यावेळी पोलिसांनी दिलेले उत्तर मी माध्यमांना दिले.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन विरोधक राजकारणासाठी वापर करत आहे. आमच्या सरकारची पॉलीसी महिलांच्या अत्याचाराबाबत झीरो टॉरलन्स आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे मी सांगितले. त्यामुळे आरोपीला वाचवण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले .
आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची यंत्रणा दोन दिवस अथक काम करत होती. त्यांना यश आले आहे. आता आरोपीवर कठोर कारवाई होईल, असे आमचे प्रयत्न आहे. मी माझा उद्देश स्पष्ट केला आहे. त्यावरुन कोणी राजकारण करु नये. आमचे सरकार लाडक्या बहिणींचे सरकार आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आमचे सरकार संवेदनशील आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणाबाबत मी प्रत्येक बैठकीत कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. गुरुवारी मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे योगेश कदम यांनी म्हटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावरून कदम याना सुनावले होते. ते म्हणाले होते, योगेश कदम जे बोलले ते वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलं. योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते, माझा स्वत:चा समज असा आहे की, ते सांगण्याचा प्रयत्न करत होते, की हा गर्दीचा भाग आहे. बस आत नव्हती, बाहेर होती. पण लोकांना प्रतिकार होताना लक्षात आलं नाही, असं त्यांचा सांगण्याचा प्रयत्न होता. तथापी ते नवीन आहेत, तरुण मंत्री आहेत. काहीतरी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे की, मी त्यांना सल्ला देईन की, अशा प्रकरणात बोलताना जास्त संवेदनशील असंल पाहिजे. कारण बोलताना काही चूक झाली, तर समाज मनावर वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. मंत्री, लोकप्रतिनिधींनी अशा घटनांबद्दल बोलताना संवेदनशी असलं पाहिजे.