विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपा युती सरकारमध्ये तिघांची तीन तोंडे आहेत, हे तिघेजण मलईसाठी व पालकमंत्रीपदासाठी भांडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागातील कंत्राटाला स्थगिती देऊन घोटाळ्याची चौकशी करत असल्याचे समजते. शिंदे सरकारच्या काळात असे अनेक घोटाळे झाले आहेत, त्या सर्वांना स्थगिती देऊन चौकशी करण्याची धमक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावी, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. ( 65 percent ministers in Mahayuti government; Is the Chief Minister threatening to take action against all? Nana Patole’s question)
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आरोग्य विभागातील घोटाळ्याप्रमाणे अन्न व नागरी पुरवठा विभाग, जलसंपदा विभाग, बांधकाम विभाग, आणि कृषी विभागातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. कृषी विभागातील भ्रष्टाचाराची काही प्रकरणी आम्ही मागील महिन्यातच उघड केली आहेत. मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल उचलले आहे, आता त्यांनी या सर्व भ्रष्टाचारी फाईलींमध्ये लक्ष घालून स्थगिती देण्याचे धाडस दाखवावे. आम्ही विरोधक म्हणून सरकारला या भ्रष्टाचारावर जाब विचारणारच आहोत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढणार असे मुख्यमंत्री म्हणत आहेत पण प्रश्न केवळ धनंजय मुंडे व माणिकराव कोकाटे यांचा नाही तर या मंत्रीमंडळात ६५ टक्के मंत्री गुन्हेगारी स्वरुपाचे आहेत हे सरकारचेच आकडे आहेत, मुख्यमंत्री या सर्वांना मंत्रिमंडळातून काढणार आहेत का? हा प्रश्न आहे आणि तसे झाले तर त्याचे स्वागतच आहे.
राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत, केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नाही, त्यांना पोलीस स्टेशनला जावे लागते. बीड, परभणी, स्वारगेटची घटना, महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे, ड्रग्जची खुलेआम विक्री केली जात आहे. नागपूर अधिवेशनातही बीड व परभणीचा प्रश्न आम्ही उपस्थित केला होता पण मुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती दिली, परभणी प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंगही आणणार आहोत. तसेच बीड प्रकरणातील आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे त्यावरही प्रश्न विचारणार आहोत. सरकारचा आशिर्वाद असल्यानेच गुन्हेगारी वाढत आहे. पोलीस महासंचालक या अकार्यक्षम आहेत, त्याचा हा परिणाम आहे. महाराष्ट्र असुरक्षित करण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे का? असा प्रश्न आहे, असेही नाना पटोले म्हणाले.