विशेष प्रतिनिधी
मुंबई : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार यांच्यासह एका यू ट्यूब चॅनलवर गोरे यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. ( Minister Jayakumar Gore’s motion against Sanjay Raut, Rohit Pawar)
एका महिलेने त्रास दिल्याचा आरोप केला होता. यानंतर आता जयकुमार गोरे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार आणि एका यूट्यूब चॅनेलवर हक्कभंग दाखल केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे. ज्यांनी आरोप केले, त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे. अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे, असा इशारा बुधवारी ( 5 मार्च ) गोरे यांनी दिला होता. त्यानंतर आता गोरेंनी गुरूवारी संजय राऊत, रोहित पवार आणि एका यूट्यूब चॅनेलवर हक्कभंग दाखल केला आहे.
“एका पत्रकाराने कुठल्यातरी आमदाराच्या विरोधात महिलेने तक्रार केली आहे, असे सांगितले. त्यावर मी म्हणालो, कुठलीही महिला असुद्या. तिला न्याय मिळत नसेल, तर आमच्याकडे यावे, आम्ही नक्कीच तो विषय मांडू. यात चुकीचे काय केले? हा विषय पर्सनली घेण्याचे कारण काय? त्यांना विषय मोठा करायचा असेल, तर पाहू,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने त्रास दिल्याचा आरोप केला होता. पीडित महिला एक बड्या कुटुंबातील असल्याचे तिने सांगितले आहे. जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण-खटावचे आमदार आहेत. 2016 पासून जयकुमार गोरे यांनी महिलेला त्रास देण्यास सुरूवात केली आहे. 2016 मध्ये अनेक नग्न फोटो गोरे यांनी व्हॉट्सअॅपद्वारे महिलेला पाठवले. या त्रासाला कंटाळून महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी गोरेंविरोधात गुन्हा दाखल झाला होता. अटक टाळण्यासाठी गोरेंनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता. गोरेंना दहा दिवस तुरुंगवारी सुद्धा झाली होती.
2016 मध्ये सातारा न्यायालयात पीडित महिलेची लेखी माफी मागितली होती. तसेच, पुन्हा त्रास देणार नाही, अशी हमी वकिलामार्फंत दिली होती. परंतु, गोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समजले जातात. तिसऱ्यांदा निवडून आलेल्या गोरेंना महायुती सरकारमध्ये ‘ग्रामविकास’सारखे तगडे खाते देण्यात आले आहे. त्यासह ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत.
मंत्री झाल्यानंतर महिलेला पुन्हा त्रास देण्यास सुरूवात केली आहे. जानेवारी 2025 पासून 2016 महिलेने केलेली तक्रार व्हॉट्सअॅपद्वारे व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे पीडितीचे नाव उघड झाले असून तिची बदनामी होत आहे. 9 जानेवारी 2025 ला एक पत्र महिलेच्या घरी आले. यात 2016 मध्ये दाखल केलेली तक्रार होती. हे पत्र सोशल मीडियात व्हायरल करून तिची बदनामी केली जात आहे, असे महिलेने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.