विशेष प्रतिनिधी
पुणे: शूटिंग संपवून एसटी महामंडळाच्या बसमधून परतणाऱ्या कलाकार तरुणीसमोर विकृताने अश्लील चाळे केले. महाबळेश्वरकडून पुण्याकडे येणाऱ्या बसमध्ये हा प्रकार घडला. ( Obscene remarks in front of young artist woman on a moving bus)
याप्रकरणी एका २६ वर्षीय तरुणीने राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणी पुणे येथे कुटुंबापासून दूर एकटीच राहते. बुधवारी साताऱ्यातील वाई येथे मालिकेच्या शूटिंगसाठी गेली होती. सायंकाळच्या सुमारास ती शूटिंग संपवून घरी येण्यासाठी पुण्याकडे निघाली. यावेळी तिच्या एका महिला सहकाऱ्याने तिला सातारा-पुणे महामार्गावरील सुरुर फाटा येथे सोडले. त्यानंतर तरुणी रात्री नऊच्या सुमारास महाबळेश्वर-स्वारगेट या एस.टी. महामंडाळाच्या बसमध्ये बसली. तिने कात्रजचे तिकीट काढले. बसमध्ये डाव्या बाजूला चार नंबरच्या सीटवर तरुणी एकटीच बसली होती.
शिरवळ येथे महामार्गावर बस थांबली. बसमधील काही प्रवासी खाली उतरले. त्यावेळी अंदाजे ४५ वर्षाचा अनोळखी पुरुष बस मध्ये चढला. त्याच्या अंगावर पांढरा शर्ट होता तसेच पाठीवर सॅक होती. तो तरुणीच्या पुढील सीटवर येऊन बसला. वारंवार तो तरुणीकडे मागे वळून पाहू लागला. त्यानंतर जागेवरून उठून तरुणीच्या सीटच्या उजव्या बाजूच्या सीटवर येऊन बसला. तरुणीकडे बघून तो हावभाव तसेच खुणवा-खुणवी करु लागला. तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्याने पॅन्टची चेन काढून तरुणीकडे बघून अश्लील चाळे केले. तरुणीने फोन आल्याचा बहाणा करुन, फोन उजव्या कानाला लावून फोनमध्ये त्याचे शुटींग केले. तरुणीने बस कंडक्टरकडे तक्रार केली. मात्र कंडक्टरने तरुणीला मदत करण्यास टाळाटाळ केली. पुढे बस महामार्गावरील आमराई हॉटेलजवळ थांबली. बस थांबल्यानंतर त्याने बसमधून उतरून पोबारा केला.
बस खेड-शिवापूरच्या टोलनाक्याच्या पुढे आल्यावर घाबरलेल्या तरुणीने बस कंडक्टरकडे जाऊन घडलेला प्रकार सांगितला. मोबाइलमधील व्हिडिओ देखील कंडक्टरला दाखवला. तसेच ‘तो माणूस अजूनही तसेच करीत आहे, त्याचे काहीतरी करा’ असे तरुणीने कंडक्टरला सांगितले. त्यावर कंडक्टरने ‘तुम्ही आधी का नाही सांगितले’ म्हणत मदत करण्यास टाळाटाळ केली.