विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)
कार्यकर्त्यांनी मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन केले. पोलिसांना धक्काबुक्की करत त्यांच्यावर हात उचलला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली, यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठा राडा झाला.
राज्यत कायदा व सुव्यवस्था राहिली नाही, तरुणांना रोजगार नाही, राज्यात स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पुणे महानगरपालिकेच्या मेट्रोस्थानकावरील मेट्रो ट्रॅक वर चढून आंदोलन करण्यात आले, घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मेट्रो स्टेशनवर आंदोलन करण्यात आले त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तुफान गोंधळ झाला. काही कार्यकर्त्यांनी पोलिसांवर देखील हात उचलला.
मेट्रो सेवा ठप्प केल्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की आणि हुज्जत झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त लावला. आंदोलकांना जबरदस्तीने बाजूला हटवले. नरेंद्र पावटेकर या कार्यकर्त्याला अटक केली.
दरम्यान, नरेंद्र पावटेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत, त्यांनी मागील तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कुठल्याच आंदोलनात व कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये आज त्यांनी पुणे मेट्रोच्या विरोधामध्ये आंदोलन केले आणि आंदोलन केल्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालणे त्याचबरोबर एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे या गोष्टी केल्या, निश्चितच या सर्व गोष्टी निषेधार्य आहेत. आजचे त्यांचे आंदोलन ही वैयक्तिक असून, त्याचा पक्षाशी काही संबंध नाही, आणि एकूणच पुणेकरांची आडवणूक करणे आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घालणे या सर्व प्रकाराबाबत पक्षाचा काहीही संबंध नाही.त्यांच्या या सर्व गोष्टी विचारात घेता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे, असे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत सुदाम जगताप यांनी सांगितले.