विशेष प्रतिनिधी
बीड : मी लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक नव्हते. मराठा आरक्षण प्रश्न पेटला होता. मराठा विरुद्ध ओबीसी, असा संघर्ष तीव्र असतानाच्या काळात मी लोकसभा लढवली. त्याचा मला फटका बसला.माझा सहा हजार मतांनी पराभव झाला, असा गौप्यस्फोट पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केला.
( Pankaja Munde reveals that she did not want to contest the Lok Sabha elections due to the Maratha vs OBC conflict)
पंकजा मुंडे एका मुलाखतीत बोलत होत्या.त्या म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत परिस्थिती माझ्या विरोधात होती. त्यामुळे मी पराभव स्वीकारला. माझ्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या. मी लोकसभेला हरले तरीही माझी मान खाली गेली नाही. पण, संतोष देशमुख प्रकरणात माझी मान खाली गेली आहे.
मुंडे म्हणाल्या, “संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी कोण आहेत, हे न्यायालयातील सुनावणीतून समोर येईल. ही एका व्यक्तीची नाही, तर नैतिकतेची हत्या आहे. एका माणसाचा जीव जातो. त्याबाबत वातावरण निर्मिती कऱण्यात येते. एका समाजाला, जातीला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. यामुळे सगळा समाज सुन्न झाला आहे.”
संतोष देशमुख माझा बुथ प्रमुख होता, कार्यकर्ता होता; त्यामुळे मलाही दुख वाटतंय. सत्तेमुळे अहंकार निर्माण होतो. सत्ता असताना कार्यकर्त्यांना सांभाळणे अवघड असते. मी सत्तेवर आहे, जे करायचे ते करा, असे राजकीय नेत्यांकडून सांगितले जाते; हे चुकीचे आहे”, असे म्हणत पंकजा मुंडेंना राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर टीका केली.
“बीडचे नाव गोपीनाथ मुंडे यांच्याशी जोडले होते, आता बीडचे नाव वाईट अर्थाने घेतले जात आहे. वंजारी समाजाच्या मुलांना वसतिगृहे, शाळांमध्ये वाईट वागणूक दिली जात आहे. बीडमध्ये सामाजिक ऐक्याला तडा गेला आहे. लोकांच्या आक्रमक भाषणांमुळे समाजांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. वंजारी समाजाला लक्ष्य केलं जात असून हे चुकीचे आहे”, अशी नाराजी पंकजा मुंडेंनी व्यक्त केली.