विशेष प्रतिनिधी
पुणे: दारूच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला बलात्काराची खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्याला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. रामनगर परिसरात रविवारी ही घटना घडली. ( Drunk man gave false information about rape to police control room)
पोलीस शिपाई अमोल सूतकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निवास नारायण अकोले (वय ४२, रा. रामनगर, वारजे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास आरोपी अकोले याने पोलीस नियंत्रण कक्षाला (११८) रामनगर परिसरात महिलेवर अत्याचार झाल्याची माहिती दिली. या घटनेची गंभीर दखल घेत वारजे पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश बडाख आणि उपनिरीक्षक आर. आर. भरसट यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. गस्त घालणाऱ्या पोलीस पथकानेही त्वरीत घटनास्थळी पोहोचून चौकशी सुरू केली.
मात्र, चौकशीत रामनगर भागात अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे तपासात उघड झाले. अकोले याने खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या विरोधात दिशाभूल करणारी माहिती देणे आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भरसट करत आहेत.