आझम पठाण
लातूर : जनवादी साहित्य संस्कृती चळवळीच्या वतीने ५ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या पहिल्या युवा जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी आजच्या आघाडीच्या युवा लेखिका डॉ ऐश्वर्या रेवडकर यांची निवड करण्यात आली आहे. संयोजन समितीच्या अध्यक्षा स्वाती कोरी, स्वागताध्यक्ष प्रा सुनील शिंत्रे, जनवादी सांस्कृतिक चळवळीचे संपत देसाई, अंकुश कदम यांनी पत्रकार परिषदेत त्याची घोषणा केली. ( Dr. Aishwarya Revadkar as the President of the Youth Democratic Literary Culture Conference)
त्यांची ‘विहिरीची मुलगी’ ही कादंबरी, ‘विजापूर डायरी’ हे अनुभवावर आधारित पुस्तक आणि अलिकडे चर्चेत असलेले ‘पाळीचे पोलिटिक्स’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तरुण वयातच लिहलेल्या या पुस्तकांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
डॉ ऐश्वर्या या मुळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील स्त्रीरोगतज्ञ आहेत. छत्तीसगडमधील आदिवासी भागातील अनुभवावर आधारित, साप्ताहिक साधनामध्ये नियमित रूपाने लेखमालिका प्रसिद्ध झाली. त्या लेखांचे संकलन ‘विजापूर डायरी’ या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशित झाले. या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा ‘ताराबाई शिंदे पुरस्कार’ मिळाला आहे. २०२४ साली त्यांची ‘विहिरीची मुलगी’ ही कादंबरी प्रकाशित झाली. स्त्रीवाद आणि लैंगिक, मानसिक आरोग्य अंगाने एका २४ वर्षीय तरुणीची कहाणी सांगणारी ही कादंबरी मरठी साहित्य विश्वात बरीच चर्चिली गेली. या कादंबरीने एक बंडखोर युवा लेखिका म्हणून डॉ ऐश्वर्या यांची ओळख मराठी साहित्यांच्या प्रांतात ठळकपणे नोंदवली गेली. नुकतेच या कादंबरीला स्वर्गीय कवी विशाल इंगोले स्मृती पुरस्काराने गौरवले आहे.
२०१४ साली वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर तरुण वयातच त्यांनी डॉ अभय बंग व रानी बंग यांच्यासोबत सर्च या सामाजिक संथेत एक वर्ष काम केले आहे. हा अनुभव पाठीशी घेत भारतातील अनेक सामाजिक संस्था संघटनेसोबत स्वतःला जोडून घेत प्रत्यक्ष जमिनीवर काम केले आहे. उतराखंड येथील आरोही सामाजिक संस्थेसह भूकंपग्रस्त सास्तूर या गावी जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ञ म्हणूनही काम केले आहे. छत्तीसगडच्या आदिवासी भागातील विजापूर आणि कोंडागाव येथील जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम केले आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, काश्मीर, उत्तरप्रदेश येथील शाळा महाविद्यालयात मासिक पाळी व लैंगिक शिक्षण यावर शिबिरे, चर्चा आणि प्रबोधनपर व्याख्याने दिली आहेत.
जनवादी सांस्कृतिक चळवळीने यापूर्वी सावंतवाडी(२०२२) आणि कोल्हापूर (२०२४) साहित्य संमेलने घेतली पण केवळ युवा वर्गासाठी होत असलेले हे पहिले साहित्य संस्कृती संमेलन आहे. आजचा तरुण साहित्य कला संस्कृतीकडे कसा पाहतो? त्याबद्दल त्याचा धारणा काय आहेत? धर्मकारण, समाजकारणाकडे तो कसा पाहतो? आज त्याच्यासमोर कोणती आव्हाने कोणते प्रश्न आहेत? त्यांना तो कसे भिडतो? याची सर्वांगीण चर्चा घडवून आणावी या हेतूने हे पहिले युवा जनवादी साहित्य संस्कृती संमेलन होत आहे.