विशेष प्रतिनिधी
पुणे: कात्रज-संतोषनगर परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुंडांची पोलिसांनी धिंड काढली.
गणेश जाधव, विशाल राऊत, समीर मारणे, ऋषिकेश लोके (सर्व वय २० ते २५) असे धिंड काढण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका १९ वर्षी दुचाकीस्वार तरुणाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आंबेगाव यथेल स्वामीनारायण मंदिराच्या पाठीमागे दिग्विजय सोसायटीच्या समोरील रस्त्यावर दुचाकीला कट मारण्याच्या कारणावरून वाद झाला. आरोपी जाधव, राऊत, मारणे, लोके यांनी १९ वर्षीय फिर्यादी याच्यावर धारदार हत्याराने सपासप वार करीत मारहाण केली होती. या घटनेत फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर आंबेगाव पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून अटक केली होती.
या प्रकरणी अटक झालेले आरोपी जाधव, राऊत, मारणे, लोके हे सगळे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर तोडफोड, राडा, दंगा, मारामाऱ्या, दहशत माजवणे असे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींची पोलिसांनी कात्रज, संतोष नगर, सच्चाई माता चौक, भगवा चौक, हनुमान नगर, शनी नगर, जांभूळवाडी रोड, पाण्याची टाकी परिसरातून धिंड काढली. तरुणांनी चुकीच्या मार्गावर जाऊ नये तसेच अशा गुंडांचा आदर्श समोर ठेवू नये, असा संदेश गुन्हेगारीकडे वळणार्या तरुणांना देण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला.