विशेष प्रतिनिधी
पुणे : तळेगाव येथील पीजीसीआयएल ४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्राबाहेर गवत पेटवल्याने महापारेषणच्या तळेगाव-लोणीकंद ४०० केव्ही टॉवर लाइनमध्ये शनिवारी (दि. १५) दुपारी ३.०५ वाजता ट्रिपिंग आले. परिणामी ३४६ मेगावॅटची तूट निर्माण झाल्याने स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा (एलटीएस) कार्यान्वित होऊन महावितरणच्या ८० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. ( Fire causes tripping of 400 KV tower line; Power outage for an hour in Chakan, Pimpri, Bhosari, Manchar Rural)
पिंपरी चिंचवड, चाकण एमआयडीसी व परिसर, भोसरी गाव व भोसरी एमआयडीसी, मंचर ग्रामीण परिसरातील सुमारे २ लाख ४९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर खंडित होता.
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे (पीजीसीआयएल) तळेगाव येथे ४००/२२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र आहे. या उपकेंद्राबाहेर अदानीच्या कार्यक्षेत्रातील ४०० केव्ही टॉवर लाइनखाली अज्ञाताने गवत पेटवल्याने महापारेषणच्या तळेगाव-लोणीकंद ४०० केव्ही टॉवर लाइनला आज दुपारी ३.०५ वाजता ट्रिपिंग आले. परिणामी तब्बल ३४६ मेगावॅटची पारेषण तूट निर्माण झाली. पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके व बिघाड टाळण्यासाठी स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ‘एलटीएस’ (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यामुळे महापारेषण कंपनीच्या चाकण ४०० केव्हीसह चाकण, चिंचवड, भोसरी, ब्रीज स्टोन, थेऊर आणि काठापूर या २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रांमधून महावितरणच्या ८० उच्चदाब वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला.
एलटीएस कार्यान्वित झाल्यामुळे चाकण एमआयडीसी तसेच शिंदेगाव, सावरदरी, वराळे, वासुली, येलवाडी, खालुंब्रे, सांगुर्डी, एमआयडीसी फेज दोन, भांबोली, कुरुळी, नाणेकरवाडी, चिंबोली, निघोजे, सारा सिटी, आळंदी फाटा, मोई आदी गावांतील ८०० उच्चदाब व ४ हजार लघुदाब औद्योगिक ग्राहक आणि ३५ हजार घरगुती व व्यावसायिक ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर खंडित होता. यासह पिंपरी चिंचवड शहर, भोसरी गाव, भोसरी एमआयडीसी, जय गणेश साम्राज्य, किवळे, ताथवडे, रहाटणी, थेरगाव, निगडी, प्राधीकरण, नाशिक रोड, इंद्रायणीनगर, ब्लॉक जे, क्यू, एस, ईएल, टी, जनरल ब्लॉक, मंचरचा ग्रामीण परिसर, नारायणगावचा पूर्व परिसर, केसनंद, आव्हाळवाडी, पेरणे, थेऊर, वडती, कुंजीरवाडी, लोणी काळभोर, सोरतापवाडी, फुरसुंगी, उरुळी देवाची आदी परिसरातील सुमारे २ लाख ४९ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा आज दुपारी ३.०५ ते ४.०५ वाजेपर्यंत तासभर बंद होता.
तळेगाव-लोणीकंद ४०० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग आल्यामुळे महापारेषणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर पाहणी सुरू केली. यामध्ये पीजीसीआयएल अतिउच्चदाबाच्या उपकेंद्राबाहेर टॉवर लाइनखालीच गवत पेटवल्यामुळे हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. पेटवलेल्या गवताच्या धुरामध्ये बाष्प असल्यामुळे ४०० केव्ही लाइनमध्ये ट्रिपिंग आले. ही आग तातडीने विझवल्यानंतर त्या ठिकाणच्या टॉवर लाइनची तपासणी करून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.