विशेष प्रतिनिधी
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने वेगवेगळ्या घटनेत तिघांची ५६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ( Fraud of Rs 56 lakh on the pretext of investing in the stock market)
सायबर चोरट्यांनी मगरपट्टा सिटी भागातील एकाची ४५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण मगरपट्टा सिटी भागात राहायला आहेत. चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते.चोरट्यांच्या खात्यावर तरुणाने रक्कम जमा केली. सुरुवातीला तरुणाला परतावा देण्यात आला. त्यानंतर तरुणाने चोरट्यांच्या बतावणीवर विश्वास ठेऊन आणखी रक्कम गुंतविली. गेल्या सहा महिन्यात चोरट्यांच्या खात्यावर तरुणाने वेळोवेळी ४५ लाख ४० हजार रुपये जमा केले. तरुणाने पैसे गुंतविल्यानंतर परताावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत.
कात्रज भागातील एकाचीही चोरट्यांनी सहा लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर तपास करत आहेत. अशाच पद्धतीने चोरट्यांनी धनकवडी भागातील एका तरुणाची सहा लाख सात हजार रुपयांची फसवणूक केली. सहकारनगर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड तपास करत आहेत.