विशेष प्रतिनिधी
पुणे: औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीवरून नागपूरमध्ये दंगल उसळली आहे.
जाळपोळ आणि दगडफेकीच्या प्रकारानंतर संपूर्ण राज्यात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्यातही संवेदन ठिकाणी बंदोबस्त वाढविला आहे. ( Tight security, sensitive patrolling, SRPF also called in Pune after Nagpur riots)
नागपूरमध्ये सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. नागरिकांच्या वाहनांवर मोठ मोठे दगड टाकून वाहने पेटवून देण्यात आली. यासोबतच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तोडण्यात आले. तसेच, अनेक दुचाकीना आग लावण्यात आली. नागरिकांच्या घरावर मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. या घटनेत तीन पोलीस उपायुक्तांसह ४० पेक्षा अधिक पोलीस जखमी झाले आहेत.
साधारणपणे ४०० ते ५०० तरुणांचा जमाव महाल परिसरामध्ये चालून आल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी साधारण ८० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
पुण्यामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी संवेदनशील भागामध्ये गस्त वाढविली असून धार्मिक स्थळांच्या परिसरात तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासोबतच पुण्यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी देखील तैनात करण्यात आलेली आहे. शहरामध्ये शांतता कायम असून कोणीही काळजी करण्याचे कारण नाही. तसेच, अफवांवर विश्वास ठेवू नये. संशयास्पद काही वाटल्यास तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.