विशेष प्रतिनिधी
मुंबई : पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काहीही झाले तरी सोडले जाणार नाही. पोलिसांवर हल्ला सहन केला जाणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची परवानगी कोणालाही दिली जाणार नाही असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ठरवून काही ठराविक घरांना, आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे नागपूर हिंसाचारात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसत आहे, असेही ते म्हणाले. (Attacks on police will not be tolerated, no one will be spared, warns Chief Minister)
नागपूर हिंसाचाराच्या घटनेवर विधानसभेत निवेदन करताना कालच्या प्रकारावर संताप व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला. संपूर्ण सभागृहाने तंट्यानाट्यानं बाके वाजवून अनुमोदन दिले. मुख्यमंत्री म्हणाले, तीन डीसीपी स्तरावरील पोलीस अधिकार्यांवर हल्ले करण्यात आले. एका डीसीपीवर तर कुऱ्हाडीने वार केला आहे. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्याला काही झाले तरी सोडणार नाही. कुणी दंगा करत असेल तर त्याच्यावर जात, धर्म न बघता कारवाई करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वांची जबाबदारी आहे. सर्व समाजाचे धार्मिक सण या कालावधीत सुरू आहेत. सर्वांनी संयम ठेवला पाहिजे एकमेकांप्रती आदरभाव ठेवावा .
हिंसाचाराच्या घटनेची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,सकाळची एक घटना घडल्यानंतर पूर्णपणे शांतता होती. त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक असा हल्ला केल्याचं समोर येतंय. कारण जवळपास एक ट्रॉलीभरून दगड सापडले आहेत. काही लोकांनी घरांवर जमा करून ठेवलेले दगड पाहायला मिळाले. शस्त्रंही मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली आहे. वाहनांची जाळपोळ झाली आहे.
एकूण तीन गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तहसील पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. असे एकूण पाच गुन्हे आहेत. ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एंट्री पॉइंटवर नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यात तहसील, कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोदरानगर, कपिलनगर या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. एसआरपीएफच्या पाच तुकड्या इथे तैनात करण्यात आल्या आहेत.
एखाद्या चित्रपटाला दोषदोष देता येणार नाही. छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला. त्यामुळे लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा राग मोठ्या प्रमाणात बाहेर येतोय, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.