विशेष प्रतिनिधी
सातारा : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर 34 एकर जमीन लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. औंध देवस्थानाची तब्बल 34 एकर जमीन बेकायदेशीररित्या हडप केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला आहे. ( Gopichand Padalkar accused of encroaching on 34 acres of Aundh temple land)
या प्रकरणामध्ये तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सुरेश धस यांनीही गोपीचंद पडळकर यांना मदत केल्याचा दावा खाडे यांनी केला आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात ही जमीन खालसा करण्याचा व्यवहार पार पडला आहे. त्यामुळे केवळ गोपीचंद पडळकरच नव्हे, तर संबंधित माजी मंत्र्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राम खाडे यांनी केली आहे. खाडे यांनी औंध संस्थानमधील या जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्रे देखील माध्यमांना दाखवली आहेत.
हा थेट धार्मिक संस्थेच्या जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रकार आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, तसेच या प्रकरणात मदत करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीदेखील खाडे यांनी केली आहे.
दरम्यान रीतसर परवानगी घेऊनच हा सगळा व्यवहार झाल्याचे पडळकर यांनी सांगितले. ते म्हणाले,
धर्मादाय आयुक्तांकडे नोंद नसलेल्या जमिनी या राज्य सरकारची रीतसर परवानगी घेऊन त्याचा कर भरणा करुन वर्ग तीन ची जमीन वर्ग एक करून ती विक्री करता येते. हे प्रकरण जुने असून रीतसर परवानगी घेऊनच हा सगळा व्यवहार झाला आहे, असे स्पष्टीकरण आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिले आहे.