विशेष प्रतिनिधी
पुणे : अल्पवयीन मुलीला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देत घरात घुसून बलात्कार प्रकरणी एकाला २० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ( Man who raped minor girl gets 20 years rigorous imprisonment)
भिमराव मुकिंदा कांबळे (वय २७, रा. सांडस, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) असे आरोपीचे नाव आहे.
२०१७ मध्ये फुरसुंगी येथे हा प्रकार घडला . घरामध्ये कोणीही नसल्याचा आणि अंधाराचा फायदा घेत कांबळे घरात घुसला. त्याने पीडितेला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडिता गर्भवती राहिली.
अल्पवयीन पीडितेने याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार भारतीय दंड विधानातील कलमांसोबतच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात साक्षीपुराव्याअंती पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश (पोक्सो) यांनी शुक्रवारी (२१ मार्च) आरोपी भिमराव कांबळे याला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकारी पक्षाकडून अॅड. विलास घोगरे-पाटील, पोलीस अंमलदार संभाजी म्हांगरे व ए. जे. गोसावी यांनी कामकाज बघितले. या कामगिरीबद्दल परीमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी पोलीस अंमलदार म्हांगरे , गोसावी आणि तपासी अधिकारी शिंदे यांना १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.