विशेष प्रतिनिधी
पुणे: गेल्या वर्षभरात पुणे पोलिसांनी जप्त केलेले तब्बल 7 कोटी 76 लाख रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात येणार आहे. पोलिसांनी 70 ते 80 ठिकाणी कारवाई करून 788 किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले होते. जप्त केलेले अंमली पदार्थ रांजणगाव येथील एका खाजगी कंपनीच्या भट्टीत नष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. ( Pune police to destroy drug stockpile worth over Rs 7.5 crore in kiln)
या जप्त केलेल्या अमली पदार्थाच्या साठ्यात मेफेड्रोन, ब्राऊनशुगर, अफू, एलएसडी, गांजा याचा समावेश आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा अमली विरोधी पथक तसेच विविध पोलीस ठाण्यातील तपास पथकांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांनाही अटक केली आहे.
या अमली पदार्थांना अनेक महाविद्यालयीन तरुण बळी पडत असल्याचे देखील समोर आले आहे. मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातून अशा अमली पदार्थांची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली आहे. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांनी याची गांभीर्याने दखल घेतल छुप्या पद्धतीने अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना तसेच तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील विविध भागातून कारवाई करत इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला.
दरम्यान मेफेड्रोन तस्करी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया असल्याचे उघडकीस आले होते. तसेच तो परदेशात फरार झाल्याचे समोर आले होते. फेब्रुवारी महिन्यात कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतीलअर्थकेम लॅबोरटरीजमध्ये मेफेड्रोन तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या ठिकाणाहून सुमारे अठराशे किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. येत्या एप्रिलमध्ये हे मेफेड्रोन नष्ट केले जाईल असा विश्वास पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक माहितीनुसार संदीप धुनिया हा देशाच्या बाहेर आहे. केंद्रीय एजन्सीकडून त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गतवर्षीच्या फेब्रुवारीमधील कारवाईआधीच ३० जानेवारीच्या सुमारास तो नेपाळमार्गे देशाबाहेर पळाला होता, असे ते म्हणाले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, न्यायवैद्यक विभागाच्या संयुक्त विद्यमाने योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून अमली पदार्थांचा हा साठा नष्ट करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या परवानगीने संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. संपूर्ण अंमली पदार्थांचा साठ्याचे वजन माफ करून नष्ट करण्याची प्रक्रिया रांजणगाव येथील एका कारखान्यात केली जाणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अमली पदार्थांच्या साठा नष्ट करण्या संदर्भात निर्णय झाला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात १ हजार ८०० किलो एमडी आणि ३ हजार ६०० कोटी रुपयांचा मुद्देमाल पडून आहे. तो देखील नष्ट करण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया पार पाडली जात आहे. येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल असा मला विश्वास आहे.