विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेता सुशांत सिंहची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यप्रकारणाची नव्याने चौकशीची मागणी करत तिचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. आता सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे ड्रग्जच्या व्यापारात सहभागी असल्याचा धक्कादायक आरोप वकिलांनी केला आहे. ( Aditya Thackeray is also accused of drug trafficking in the Disha Salian case)
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोली, सचिन वाझे, परमबीर सिंह आणि रिया चक्रवती यांच्यासह उद्धव ठाकरे हे सुद्धा सगळे आरोपी आहेत, असा आरोप सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी केले आहे.
सतीश सालियन यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर निलेश ओझा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.ओझा म्हणाले, “दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोली, सचिन वाझे, परमबीर सिंह, रिया चक्रवर्ती हे सगळे आरोपी आहेत. आदित्य ठाकरेंचे नाव आल्यावर वाचवण्यासाठी परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, सीसीटीव्ही आम्ही चेक केले आहे. फ्लॅटवर कुठलाही राजकीय नेता आला नव्हता. परंतु, मोबाईल टॉवरच्या लोकेशनपासून प्रत्यक्षदर्शीपर्यंत हे सगळे परमबीर सिंह यांना खोटे ठरवत आहे.
आदित्य ठाकरे हे ड्रग्जच्या व्यापारात सहभागी आहेत. समीर खान नावाच्या कंपनीला अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी आरोपी करण्यात आले होते. आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोली हे नियमित समीर खानच्या कंपनीच्या संपर्कात होते. यात आणखी काही जणांचा सहभाग आहे. मात्र, त्यांची नावे मी घेणार नाही. आदित्य ठाकरेंचा ड्रग्जच्या व्यापाराशी संबंध आल्यावर समीर वानखेडेंसह अन्य अधिकाऱ्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यापासून कुणी रोखले होते? किती कोटी रूपयांची डील झाली होती?” असा सवाल ओझ यांनी व्यक्त केला आहे.
“दिशा सालियन प्रकरणातील 10 साक्षीदार गायब झाले आहेत. कुणाचा अपघात दाखवला, कुणाची हत्या केली. दिशा सालियन हीचा स्टीव पिंटो हा मित्र होता. त्याने सोशल मीडियावर काही पोस्ट लिहिल्या होत्या. 7 जून 2020 ला एकता कपूरच्या घरी पार्टी झाली. त्यात परमबीर सिंह, सुशांत सिंह, दिशा सालियन आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते, असे स्टीव पिंटोने सांगितले होते. याच स्टीव पिंटोने दिशाची कशी हत्या झाली, याची हिंट दिलेली. तेव्हापासून पिंटो गायब आहे? ही पोस्ट कुणी लिहिल्या होत्या? स्टीव पिंटो कुठे गेला? याचीही चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी ओझा यांनी केली आहे.