विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुद्दुचेरी येथे बसून महाराष्ट्रातील वातावरण चिघळविणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. वाढीव मुदत देण्यासही नकार दिला आहे. (
Mumbai Police summons Kunal Kamra again refuses to give time limit)
कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारे गाणे त्याच्या कॉमेडी शोमध्ये सादर केलं. यामुळे कुणाल कामराच्या विरोधात पोलिसात गुन्हाही दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांनी त्याला समन्स बजावलं होतं पण तो चौकशीसाठी हजर राहिला नाही. आता मुंबई पोलिसांनी त्याला पुन्हा समन्स बजावलं आहे. तसंच यावेळी वाढीव मुदत देण्यासाठी पोलिसांनी नकार दिला आहे.
कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी दुसरे समन्स बजावले आहे. कुणाल कामराने चौकशीसाठी यावं यासाठी त्याला पहिले समन्स बजावण्यात आले होते . पण तो हजर राहिला नाही. मंगळवारी सकाळी ११ वाजता हजर राहण्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला पहिलं समन्स पाठवलं होतं. पण तो हजर राहिला नाही.
कुणाल कामराने थाने का रिक्षावाला असे गाणे तयार करून त्यात एकनाथ शिंदे यांचा उल्लेख गद्दार असा केला होता. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. कुणाल कामराने ज्या हॉटेलमध्ये शो केला त्या ठिकाणी असलेल्या स्टुडिओचीही तोडफोड करण्यात आली. त्या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आमदार मुरजी पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुणाल कामरा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल कामराविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ३५३ (१) ब, ३५३ (२) आणि ३५६ (२) बदनामी या कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यात कुणाल कामराविरोधात पहिली पोलीस तक्रार दाखल झाली. त्यानंतर हा गुन्हा झीरो एफआयआर म्हणून खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. कुणाल कामराने या प्रकरणात चौकशीला येण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. त्याने त्याच्या वकिला करवी तशी विनंती केली. मात्र पोलिसांनी ही विनंती फेटाळली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात हॅबिटट स्टुडिओ तसंच या शोशी संबंधित असलेले इतर लोक यांनाही चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.
कुणाल कामराने एक पोस्ट लिहून आपली भूमिका मंडळी होती. त्यात म्हटले आहे की , मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचं ठरवलं आहे. पोलिसांनी आणि न्यायालयाने माझ्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. मात्र कायदा सर्वांसाठी समान असतो त्यामुळे अशाही लोकांविरोधात कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते हॉटेल फोडलं. एक जोक ऐकून त्यांनी हॉटेल फोडलं आहे. तसंच जे निवडून आलेले नाहीत अशा महापालिका सदस्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे. हॅबिटट या ठिकाणी तोडफोड करायला ते कुठलीही नोटीस न देता हातोडे घेऊन कसे आले? असे प्रश्न कुणाल कामराने विचारले आहेत. पोलिसांना सहकार्य करणार अशी भूमिका त्याचीच आहे. तरीही कुणाल कामरा चौकशीसाठी उपस्थित राहिलेला नाही. त्यामुळे त्याला दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे.