मुंबई: संविधान किती मोठे आहे, हे आज आपण पाहू शकतो. चहा टपरीवर काम करणारे पंतप्रधान, रिक्षा चालवणारे मुख्यमंत्री, पान टपरी चालवली ते विधानसभेचे उपाध्यक्ष झाले. लोकशाहीमुळे संधीची समानता आली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Chief Minister saidthe Constitution guarantees equality of opportunity to the general publicthe Deputy Speaker of the Legislative Assembly who runs the Pantapari)
विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर प्रस्ताव मांडला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा बनसोडे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करताना त्यांचा राजकीय प्रवास आणि अनुभव यांची प्रशंसा केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मातीशी नाळ जोडलेल्या सामान्य कार्यकर्त्याची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड होणे हे भारतीय संविधानाने दिलेल्या संधीच्या समानतेचे उत्तम उदाहरण आहे. राज्याच्या विधानमंडळाला मोठी गौरवशाली परंपरा आहे. या परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. अण्णा बनसोडे उपाध्यक्ष झाले, ही घटना केवळ त्यांचा गौरव नसून राज्यातील १३ कोटी जनतेचा अभिमान आहे. संविधानाने दिलेल्या समानतेच्या हक्कामुळेच आज सामान्य माणूसही उच्चपदावर पोहोचू शकतो.
महाराष्ट्र विधानमंडळ देशातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या सभागृहांपैकी एक आहे. या सभागृहाच्या परंपरेला पुढे नेण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी समन्वयाने काम करून या सभागृहाचा अधिक लौकिक वाढवूया. उपाध्यक्ष पद हे महाराष्ट्र विधानसभेतील सन्मानाचे पद आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी या पदाचा गौरव वाढविला आहे.अण्णा बनसोडे यांची या पदासाठी निवड त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. पिंपरीचे आमदार म्हणून ते तिसऱ्यांदा निवडून आले असून, त्याआधी महानगरपालिकेत नगरसेवक पदाची हॅटट्रिक त्यांनी केली आहे. तसेच, स्थायी समितीच्या अध्यक्षपदीही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, असेही फडणवीस म्हणाले.
अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार आणि आता उपाध्यक्ष असा चढता राहिला आहे. त्यांच्या निवडीने विधानसभेला सक्षम उपाध्यक्ष मिळाला असून त्यांनी या जबाबदारीतून संविधानिक परंपरेचा सन्मान वाढवावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
अध्यक्ष पदावर विधीतज्ज्ञ ॲड. राहुल नार्वेकर आणि त्यांच्यासोबत सामाजिक व राजकीय प्रश्नांची जाण असलेला सदस्य हे उपाध्यक्ष म्हणून काम करणार आहेत. आपल्या या अनुभवातून विधानमंडळाचा बहुमान उंचावेल. अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोघांच्या समन्वयातून या सभागृहाला निश्चितपणे न्याय मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.