विशेष प्रतिनिधी
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीड जिल्हा कारागृहात मारहाण करण्यात आली. बबन गिते गँगमधील महादेव गीतेने या दोघांना मारहाण केल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. ( Valmik Karad and Sudarshan Ghule attacked in Beed Jailbeaten up by Baban Gite gang)
कारागृह नियमावलीनुसार, रोज सकाळी 10.30 ते 11 या वेळात बंदी उठवली जाते. यावेळेत तुरुंगात कैद्यांना मोकळे सोडले जाते. याच कालावधीमध्ये बबन गित्ते आणि वाल्मिक कराड यांच्या गँगमध्ये मारामारी झाली.
यावर एबीपी माझा या वाहिनीशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले , वाल्मिक कराड विरुद्ध बबन गिते अशा परळीतल्या टोळीयुद्धाचा हा परिणाम आहे. वाल्मिक कराड आधी म्हणायचे की, याला संपवल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही. गित्ते म्हणायचा की कराडला संपवल्याशिवाय मी दाढी करणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात नावं चुकीच्या पद्धतीनं नावं गोवली यावरून ही मारहाण झाली असावी. कारागृहातील सुरक्षा आणि बीड पोलिस यावर चार तासांचा सिनेमा निघेल. मी तिथे जाऊन पोलिसांशी बोलून जास्त माहिती देतो.
बापू आंधळे हे मरळवाडीचे सरपंच म्हणून निवडून आले होते. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये. सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गिते याच्यासह मुकुंद गिते, महादेव गिते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खून प्रकरणातील आरोपी बबन गिते अद्याप समोर आलेला नाही. आंधळे खून प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दिल्या गेल्या होत्या. एकूण 11 जणांवर गुन्हा नोंद होता. यात वाल्मिक कराड विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. मात्र परळी पोलिसांनी तपासात वाल्मिक कराडचा सहभाग नसल्याचे सांगून त्याचे नाव आरोपीतून वगळले आहे. त्यातूनच हा प्रकार घडला.