विशेष प्रतिनिधी
पुणे: नारळपाणी विक्रेत्याने विनाकारण ज्येष्ठाला शिवीगाळ करीत गालावर चापट मारली. तसेच नारळ सोलण्याचे धारदार हत्यार उगारून ज्येष्ठाच्या हाताला चावा घेतला. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Coconut water vendor bites elderly mans hand)
रितेश श्रीराम बलीपाठक (वय ४०, रा. प्रेमनगर, मार्केटयार्ड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या नारळपाणी विक्रेत्याचे नाव आहे. चंद्रकांत रघुनाथ मोहोळ (वय ६३, रा. तीन हत्ती चौक, धनकवडी, पुणे) यांनी याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (३० मार्च) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी मोहोळ हे मार्केटयार्ड येथील गेट क्रमांक एक समोरील बस स्थानकाजवळ नारळपाणी पिण्यास थांबले होते. नारळपाणी विक्रेता बलीपाठक याने विनाकारण फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्या गालावर मारले. तसेच त्यांच्यावर नारळ सोलण्याचे हत्यार उगारले. तेव्हा फिर्यादी यांनी आरोपीला विरोध केला. तेव्हा आरोपीने फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या तळहाताला चावा घेतला. यामध्ये फिर्यादी जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.