विशेष प्रतिनिधी
पुणे : महापालिका निवडणुका झाल्या नसल्याने प्रशासकाचा कारभार सुरु आहे. त्यामुळे अधिकारी मुजोर झाल्याचे उदाहरण पाहायला मिळत आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे माजी पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना अधिकाऱ्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने आंदोलनाचा इशारा द्यावा लागला. ( Municipal Officers Act ArrogantlyMinister Chandrakant Patil Warns of Agitation)
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील सूस घनकचरा प्रकल्पावरुन आक्रमक झाले. .पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांची झाडाझडती घेत, आजच प्रकल्प बंद न झाल्यास, उद्या या प्रकल्पाविरोधात खूर्ची टाकून बसण्याची वेळ येऊ देऊ नका, असे म्हणत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला.
सूस रस्त्यावरील ओल्या कचऱ्यापासून सीएनजी तयार करण्याचा प्रकल्प बंद करण्याची सातत्याने मागणी होत आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद करुन नांदे-चांदे येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय जानेवारी २०२४ मध्ये झाला होता. त्याअनुषंगानेचंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्या सोबत आज बैठक झाली. या बैठकीत पाटील यांनी सदर प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.
या बैठकीत अद्याप सदर प्रकल्प स्थलांतरित का झाला नाही? असा प्रश्न ना. पाटील यांनी उपायुक्त संदीप कदम यांना विचारला. त्यावर कदम यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे महापालिकेकडून कोणतीच कारवाई झालेली नसल्याने, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.
तसेच, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधून महापालिकेच्या भोंगळ काराभाराप्रति निषेध व्यक्त केला. त्याशिवाय महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांना सदर प्रकल्प आजच बंद झाला नाही; तर उद्या प्रकल्पाविरोधात बसण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा दिला.