पुणे : गर्भवती तनिषा भिसे हिच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप होत असून, या घटनेने संपूर्ण पुणे शहराला हादरवून टाकले आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी रुग्णालयाबाहेर शिवसेनेचे दोन्ही गट – उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट – तसेच पतीत पावन संघटना आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आणि आक्रमक आंदोलन छेडले. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी चक्क रुग्णालय अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकली व रूग्णालयाच्या फलकावर काळं फासलं.
पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने माणुसकीला हरताळ फासला; जुळ्यांना जन्म देणाऱ्या आईचा मृत्यू, रुग्णालयाबाहेर संतापाची लाट – चिल्लरफेक, काळं फासणं, घोषणाबाजी pic.twitter.com/MWCVNlqt3o
— DCN Maharashtra (@DCNMaharashtra) April 4, 2025
आंदोलनादरम्यान प्रचंड गोंधळ निर्माण झाला. संतप्त कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकत निषेध व्यक्त केला आणि रुग्णालयाच्या फलकावर काळं फासून निष्काळजीपणाचा निषेध केला. घोषणाबाजी करत “दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे”, असा आवाज परिसरात घुमत होता.
घटनेचा पार्श्वभूमी:
तनिषा भिसे ही गर्भवती महिला तातडीच्या उपचारांसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाली होती. तिच्या कुटुंबियांनी सांगितले की, रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. यामध्ये त्यांनी तत्काळ तीन लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली होती, तरीही रुग्णालयाकडून उपचार करण्यास नकार दिला गेला. या विलंबामुळे तनिषाचा मृत्यू झाला, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. विशेष म्हणजे, तनिषाने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता.
सामाजिक आणि राजकीय पडसाद:
या धक्कादायक घटनेनंतर शहरभर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी आणि सामाजिक संघटनांनी माणुसकीचा घात झाल्याचे म्हणत निषेध नोंदवला आहे. ही बाब केवळ आरोग्य व्यवस्थेतील बेजबाबदारपणाच नव्हे, तर एका कुटुंबाच्या आयुष्यावर झालेला घाला आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
सरकारी पातळीवर कारवाई:
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, यासाठी एक स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे. ही समिती लवकरच अहवाल राज्य सरकारकडे सादर करणार असून, त्यानंतरच रुग्णालयाची भूमिका अधिक स्पष्ट होईल, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
भाजपाचे आमदार अमित गोरखे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
“दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल फक्त श्रीमंतांसाठी?”
आ. अमित गोरखे म्हणाले, “जे रुग्णालय स्वतःला धर्मादाय संस्था म्हणवते, ते आज केवळ श्रीमंतांची सेवा करणारे धंदेवाईक ठिकाण बनले आहे. जर त्यांना पैसेच नको होते, तर त्या गर्भवती महिलेला का नाकारलं? गरिबांच्या जिवाला किंमतच उरलेली नाही का?”
“डॉक्टरांना पैसा महत्त्वाचा की रुग्णाचा जीव?”
त्यांनी डॉक्टरांवरही थेट आरोप करत म्हटले, “डॉक्टरांची पहिली जबाबदारी रुग्णाचे प्राण वाचवण्याची असते. मात्र, येथे केवळ ‘पैसे दिले तरच उपचार’ ही मानसिकता दिसते. अशा वृत्तीने वैद्यकीय क्षेत्राची नैतिकता धोक्यात येते.”
“कारवाई होईल, पण भगिनीचे प्राण परत येतील का?”
गोरखे पुढे म्हणाले, “या प्रकरणात कारवाई होईलही, दोषींवर कारवाई केली जाईल. पण आमच्या भगिनीचे प्राण परत येतील का? जोवर गरीब-श्रीमंत असा भेदभाव वैद्यकीय सेवेत केला जातो, तोवर अशा घटनांना आळा बसणार नाही.”