विशेष प्रतिनिधी
मुंबई : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर संताप व्यक्त होत असताना या रुग्णालय प्रशासनाची मुजोरीही समोर आली आहे. तनिषा भिसे प्रकरणात मुख्यमंत्री कक्षालाही या रुग्णालयाने प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून रुग्णालयाला सुनावले आहे. (Dinanath Mangeshkar Hospitals failure even the Chief Ministers office did not respond the Chief Minister himself narrated it)
या घटनेबाबत संताप व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वत: मुख्यमंत्री कक्षाने दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील घटनेबद्दल लक्ष घातले होते. मात्र, रूग्णालयाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. अशा घटना घडू नये म्हणून अतिशय कडक कारवाई करण्याचा आमचा मानस आहे.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टरांनी प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला भरती करून घेण्यास नकार दिला किंवा अधिकचे पैसे मागितले. लोकांमध्ये याची प्रचंड चिड निर्माण झाली आहे. धर्मदाय रूग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने तनिषा भिसे नावाच्या महिलेला पैशांअभावी उपाचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिला. नंतर दुसऱ्या रूग्णालयात दाखल केल्यावर तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. ही घटना समोर आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. सर्व पक्षांनी आंदोलने करत आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. असंवेदशीलतेचा परिचय या घटनेतून पाहायला मिळतोय. खरेतर दीनानाथ मंगेशकर हे अतिशय प्रसिद्ध रूग्णालय आहे. लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबाने हे रूग्णालय उभे केले आहे. धर्मदाय रूग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे. यासाठी एक समिती नेमली आहे. ही समिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील घटनेचा तपास करेल. त्यासह अशा घटना घडू नये म्हणून धर्मदाय रूग्णालयांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. पैशांची काळजी न करता रूग्णाला रूग्णालयात भरती करण्याची गरज होती. त्यामुळे नियमांचे पालन होतेय की नाही, यासंदर्भात प्रयत्न करणार आहोत.
धर्मदाय ही संस्था स्वतंत्र चालते. परंतु, न्याय विभागाचे थोडे नियंत्रण धर्मदाय संस्थेवर आहे. धर्मदाय रूग्णालयांचा एक प्लॅटफॉर्म देखील तयार केला आहे. रूग्णालयाच्या जबाबदाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम आमचे असणार आहे. धर्मदाय रूग्णालय सरकारला ताब्यात घेता येत नाही. अनियमितता असेल, तर धर्मदाय आयुक्त त्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.