विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील तरुणांना प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाचा अनुभव मिळावा, त्यांच्यात नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम आता नव्या स्वरूपात पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी समाजमाध्यम ‘एक्स’ वरून याची औपचारिक घोषणा केली. ( 60 talented youth from the state will get the opportunity to work in the administration under the Chief Ministers Fellowship Program)
या उपक्रमाअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांतून एकूण ६० तरुणांची निवड करण्यात येणार आहे. या निवडलेल्या उमेदवारांना एक वर्षासाठी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी दिली जाईल. त्यांना जिल्हा प्रशासनाशी थेट संपर्क साधता येईल आणि राज्याच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येईल.
या फेलोशिपचा मुख्य उद्देश म्हणजे तरुणांच्या कल्पक विचारसरणीचा, नव्या दृष्टिकोनाचा आणि तंत्रज्ञानातील कौशल्याचा उपयोग प्रशासनाच्या कामात होणे. तसेच तरुणांना व्यवस्थापन, धोरण अंमलबजावणी, संशोधन आणि धोरण विश्लेषण याचा थेट अनुभव मिळेल.
फेलोशिपचा कालावधी १२ महिने असून, वयोमर्यादा २१ ते २६ वर्षे आहे. अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल. अर्ज शुल्क ५०० रुपये असेल. पात्रता म्हणून कोणत्याही शाखेतील किमान ६० टक्के गुणांसह पदवी, एक वर्षाचा अनुभव, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि संगणक हाताळणीचे कौशल्य आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ६१ हजार ५०० रुपये दरमहा देण्यात येणार आहेत.
अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे. अर्ज आणि निवड प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असून, लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
हा कार्यक्रम केवळ सरकारी अनुभव देणारा नसून, भविष्यात प्रशासकीय सेवांमध्ये जाण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. राज्याच्या विकासात सक्रिय भाग घेण्याची, नव्या पिढीला दिशा देण्याची ही एक अनोखी संधी आहे.