विशेष प्रतिनिधी
पुणे : दीड वर्षांच्या बालकाचा टँकरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वारजे भागातील गणपती माथा परिसरात शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी टँकर चालकाला अटक करण्यात आली आहे. टँकर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( One and a half year old child dies after being hit by tanker truck)
अधोक्षक महेश वहाळे (वय १८ महिने) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी टँकर चालक सनी प्यारे बारसकर (वय ३३, सध्या रा. वडाचा गणपती मंदिराजवळ, दत्तवाडी, मूळ रा. भैय्यावाडी, सहापूर, जि. बैतुल, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली.
गणपती माथा परिसरातील रहिवासी छाया वहाळे यांचा नातू अधोक्षक शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घराबाहेर खेळत होता. या भागात एका इमारतीच्या टाकीत पाणी भरण्यासाठी टँकर आला होता. हा टँकर मागे नेत असताना घरासमोर खेळणारा अधोक्षक मागच्या चाकाखाली सापडला. त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर रहिवाशांनी टँकर चालक बारसकर याला चांगलाच चोप दिला. त्यांनंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. टँकर चालक बारसकर याला ताब्यात घेण्यात आले. बारसकर याला अटक करण्यात आली आहे. तर टँकर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करत आहेत.