विशेष प्रतिनिधी
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेली पाच लाख रुपयांची आर्थिक मदत आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेली एक लाख रुपयांची मदत भिसे कुटुंबीयांनी स्पष्ट शब्दांत नाकारली आहे. “आम्हाला पैसे नकोत, आम्हाला न्याय हवा,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.( Bhise family rejects Eknath Shindes financial assistance of Rs. 5 lakh)
कुटुंबीयांनी स्पष्टपणे सांगितले की, दोषी ठरलेल्या रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, भिसे कुटुंबीयांनी पुण्यातील अलंकार पोलिस ठाण्यात रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालाच्या नावाखाली तनिषा भिसे यांच्या आयव्हीएफ उपचारांची वैयक्तिक माहिती परवानगीविना सार्वजनिक करण्यात आली. या अहवालामुळे कुटुंबाची समाजमाध्यमांवर बदनामी झाली असून, त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.
ही माहिती जाहीर करणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी तक्रारीत केली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाने देखील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करण्याचे आदेश पुणे पोलिस आयुक्त आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला दिले आहेत. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली. मृत तनिषा आणि त्यांच्या कुटुंबाची गोपनीय माहिती परवानगीविना जाहीर केल्याने मानसिक त्रास झाल्याची तक्रार सविता भिसे यांनी आयोगाकडे केली होती.