विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॅंकांमध्ये मराठी भाषेचा आग्रह धरत गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकार घडले हाेते. कायदा हातात घेऊ नका असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर मनसेने आंदोलन स्थगित केले. मात्र, हा विषय आपण साेडला नसल्याचे राज ठाकरे यांनी दाखवून दिले असून इंडियन बँक असोसिएशनला पत्र पाठवून थेट इशारा दिला आहे. (Raj Thackerays direct warning to the Bank Association)
राज्यातील बँकेमध्ये प्रादेशिक भाषेचा वापर करणे हे अनिवार्य असतानाही इथे मात्र काही बँकांमध्ये जाणूनबुजून मराठी भाषेला डावलले जात आहे. मात्र यापुढे सर्व बँकांना असोसिएशनमार्फत प्रादेशिक भाषा वापराबाबत योग्य ती समज द्यावी, अन्यथा मनसेकडून मराठी भाषेसंदर्भात प्रखर आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही बँकेची असेल, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पत्रातून दिला आहे.
बँकांमधील मराठी भाषा वापराबाबत राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर , नितीन सरदेसाई यांच्यासह मनसे नेत्यांच्या शिष्टमंडळाने इंडियन बँक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुलकुमार गोयल यांची भेट घेतली. याबाबत बाळा नांदगावकर पत्रकारांशी बाेलताना म्हणाले, गुढीपाडव्याच्या भाषणात राज साहेबांनी महाराष्ट्र व मुंबई येथील बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य आहे अशी भूमिका मांडली. तसेच रिझर्व बँकेने काही नियम आखून दिले त्यामध्ये मराठी भाषेचा वापर हा बँकेच्या नियमित कार्यासाठी वापरावा. त्यामुळे बँकेत आमची काही कार्यकर्ते गेल्यामुळे तेथील काही अधिकाऱ्यांनी उद्दामपणा करत बोलले. त्यामुळे आम्ही युनियन बँक असोसिएशन ही एक संस्था आहे यातील डायरेक्टर यांची वेळ घेतली, हे डायरेक्टर भारतभर काम करून आल्यामुळे त्यांना विविध भाषांची ज्ञान आहे. या बँकेचे अध्यक्ष अतुल कुमार गोयल यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज साहेबांनी बँकेच्या मराठी भाषा वापरण्यास संबंधित काढलेले पत्र देण्यात आले. तसेच रिझर्व बँकेने या नियमाने अटी घातलेले आहेत त्याचेही पत्र त्यांना देण्यात आले.
नांदगावकर म्हणाले, दुर्दैवाने आम्ही तिकडे गेले असताना विधी विभागात फक्त एक मराठी माणूस काम करत आहे. १९४६ पासून ही संस्था स्थापन झाली आहे आणि यामध्ये फक्त एकच मराठी माणूस असल्यामुळे बँकेचा व्यवहार मराठीत करत नाही, त्यावर त्यांनी मराठी भाषा शिकून घेतील आणि ती बँकेच्या कामात वापरतील असा शब्द दिला आहे. तसेच बँकेच्या सर्व शाखांमध्ये मराठी अधिकाऱ्यांचा जास्तीत जास्त कसा समावेश होईल याबद्दल आम्ही विनंती केली आहे.